पाऊस चांगला झाल्याने नैसर्गिक पाणवठ्यांवर मुबलक पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- जिल्ह्यातील चोपडा, यावल, चारठाणा, वडोदा, पाल ज्या वनक्षेत्रात वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे वन्यजीव हे मानवी वस्तीत प्रवेश करत असतात. त्यामुळे वन्यजीव विरुद्ध मानव असा संघर्ष निर्माण होत असतो. पाण्याच्या शोधात वन्य जीव मानवी वस्तीत येऊ नये म्हणून वनविभागाकडून चार वर्षांपूर्वी १०० हून अधिक पाणवठे तयार केले आहेत. दर वर्षी उन्हाळ्यात या पाणवठ्यांवर वन विभागाकडून पाण्याची व्यवस्था केली जात असते. दरम्यान, या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने, नैसर्गिक पाणवठ्यांवर देखील मुबलक पाण्याचा साठा आहे. यामुळे या वर्षी वन्यजीवांचा पाण्याची समस्या भासणार नाही असा दावा वनविभागाकडून केला जात आहे. मात्र, वनविभागाकडून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्या वर पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी वन्यजीव प्रेमीकडून केली जात आहे