लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या १६ अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांनी शुक्रवारपासून पुकारलेल्या बेमुदत संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील १६ अव्यावसायिक मार्केट शुक्रवारी पूर्णपणे बंद होते. महिनाभरात गाळेधारकांनी पुकारलेला हा दुसरा संप असून, आता जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा संप कायम राहणार असल्याची माहिती गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी दिली.
महापालिका प्रशासनाने तीन दिवसांपूर्वी मदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना नुकसानभरपाईचा रकमेसह थकीत भाड्याची रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, याबाबत राज्य शासन जोपर्यंत तोडगा काढणार नाही तोपर्यंत मनपा प्रशासनाने कारवाई करू नये अशी मागणी गाळेधारकांनी केली होती. मात्र तरीही मनपा प्रशासनाकडून महात्मा गांधी मार्केट मधील एक गाळा सील केल्यानंतर गाळेधारक संघटनेने शुक्रवारपासून बेमुदत संपाची हाक दिली होती. या हाकेला साथ देत शहरातील १६ मार्केट शुक्रवारी संपूर्ण बंद होते. अनेक मार्केटमध्ये दुकानदार जमा झाले होते मात्र एकही दुकान शुक्रवारी उघडण्यात आलेले नाही.
आता गाळेधारकांची ही अंतिम लढाई
आतापर्यंत शहरातील मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा वापर सर्वांनी करून घेतला आहे. मात्र, गाळेधारकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी कोणीही पुढाकार घ्यायला तयार नाही. यामुळे गाळेधारकांनीच आता हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केला असून, ही लढाई आता अंतिम लढाई असून जोपर्यंत गाळेधारकांच्या प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत ही लढाई कायम राहणार असल्याची माहिती गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात येईल
प्रशासनाने गाळेधारकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास, किंवा मुदत संपलेल्या मार्केट मधील एकही दुकान सील केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा गाळेधारकांकडून देण्यात आला आहे. गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष पांडुरंग काळे यांच्या उपस्थितीत १६ मार्केटच्या अध्यक्षांची व पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी देखील बैठक घेण्यात आली. बैठकीत राजस कोतवाल, संजय पाटील, युवराज वाघ, तेजस देपुरा, पंकज मोमाया, वसिम काझी, सुरेश पाटील, विलास सांगोरे, रिजवान जागीरदार, प्रकाश गागडाणी, रमेश तलरेजा, सुजित किनगे, शैलेन्द्र वानखेडकर, हेमंत परदेशी, शिरीष थोरात, अमोल वाणी, अमित गौड उपस्थीत होते. या बैठकीत आंदोलनाच्या पुढील पर्यायांबाबत चर्चा झाली.