लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रहिवासी कमळाबाई वामन व्यवहारे या शंभर वर्षांच्या आजींनी मंगळवारी रोटरी भवनातील केंद्रात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. विशेष बाब म्हणजे केंद्रावर पायऱ्या चढता येत नसल्याने डॉ. मिलिंद बारी यांनी बाहेर येऊन त्यांना लस दिली. लसीकरणानंतर सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
कमळबाई व्यवहारे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव निवृत्तीनाथ व्यवहारे व नातसून वृषाली व्यवहारे उपस्थित होते. कमळाबाई यांनी स्वत: लस घ्यायचा विचार मांडला, लागलीच त्यांचे नातू यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद बारी यांच्याशी बोलून याबाबत विचारणा केली व लसीकरण करण्याचे अखेर ठरले. दुपारी २ वाजता कमळाबाई व कुटुंबीय २ वाजता पोहोचले. या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण करून, डॉ. बारी यांनी कमळाबाई होत्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना लस दिली. कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले.