जळगाव : आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ करिता ज्या बालकांची निवड झाली आहे, त्यांनी ३० जूनपर्यंत प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. त्यानुसार आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील १ हजार ८७ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहे.
वंचित गटातील तसेच दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे १ ली ते ८ वीपर्यंतचे शिक्षण विनाशुल्क मिळावे, यासाठी शासनाकडून दरवर्षी या घटकातील बालकांसाठी २५ टक्के शिक्षणाचा हक्क अर्थात आरटीईअंतर्गत मोफत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यंदा प्रवेशासाठी ७ एप्रिल रोजी लॉटरीची प्रक्रिया राज्य स्तरावरून पूर्ण करण्यात आली आहे. या लॉटरीमध्ये जळगाव जिल्ह्यातील एकूण २६९५ अर्जांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत १ हजार ८७ विद्यार्थ्यांनी संबंधित शाळांमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. तर १ हजार ४५९ विद्यार्थ्यांनी तात्पुरता प्रवेश मिळविला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत शाळांमध्ये प्रवेश निश्चित करावयाचा आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल. दरम्यान, निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये आवाहन केले आहे.