लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अधिक दक्ष होत असून दिवसेंदिवस कठोर निर्णय घेतले जात आहेत. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी रविवारपासून जिल्ह्यात प्रवेशाच्या ११ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.
दरम्यान, या सीमा तपासणी नाक्यांवर ८ पोलीस कर्मचारी व एक दुय्यम अधिकारी नियुक्त करण्यात आलेला आहे. प्रत्येकाची सहा तासांची ड्युटी राहणार असून चार शिफ्टमध्ये हे कर्मचारी ड्युटी करतील. म्हणजे या नाक्यावर २४ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मध्यप्रदेशातून येणाऱ्या मार्गावर देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रविवारी सायंकाळपासून त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी लागू झाल्यानंतर ३१ ठिकाणी सीमा तपासणी नाके कार्यान्वीत करण्यात आले होते. यंदा पोलीस अधीक्षकांनी या नाक्यांची संख्या कमी करुन ती ११ वर आणली आहे. त्यातही बंदोबस्त मात्र वाढविलेला आहे.
जळगाव शहरात देखील प्रत्येक चौकाचौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. अकार्यकारी शाखेचे अधिकारी, कर्मचारी कधीही बंदोबस्तावर नसायचे, यंदा या शाखेतील अधिकारी, कर्मचारी यांनाही रस्त्यावर उतरविण्यात आले आहे. रोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत तर शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त होते. अनावश्यक फिरणाऱ्या लोकांची गर्दी यामुळे कमी होऊ लागली आहे. प्रत्येक चौकात एक अधिकारी व सात ते आठ कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत.
मोफत कोरोना तपासणी
शहरात विनाकारण नागरिकांनी फिरु नये तसेच संसर्ग वाढू नये यासाठी पोलीस दलाच्या वतीने तपासणी नाक्यांवरच नागरिकांची कोरोना चाचणी घेतली जात आहे. विशेष म्हणजे ही चाचणी मोफत आहे. जी व्यक्ती निगेटिव्ह आली त्यांना सोडले जाते, जी व्यक्ती पाॅझिटिव्ह आली त्यांना तिथूनच रुग्णालयात हलवण्यात येते. पॉझिटिव्ह लोकांपासून इतर नागरिक किंवा कुटुंब बाधित होऊ नये त्याला वेळीच रोखता यावे हाच त्यामागचा हेतू असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी ''लोकमत''ला सांगितले.
अशा आहेत जिल्हा सीमा
नाशिक ग्रामीण आंतरजिल्हा बाॅर्डर
पिलखोड : मेहुणबारे पो.स्टे
धुळे जिल्हा आंतर जिल्हा बाॅर्डर
गलंगी : चोपडा ग्रामीण पो.स्टे
चोपडाई : अमळनेर पो.स्टे
सबगव्हाण : पारोळा पो.स्टे.
दहिवद : मेहुणबारे पो.स्टे.
बऱ्हाणपूर आंतरजिल्हा बॉर्डर
खापरखेडा : मुक्ताईनगर
चोरवड : रावेर
पाल : रावेर
वैजापूर : चोपडा ग्रामीण
बुलढाणा आंतरजिल्हा बाॅर्डर
चिखली : मुक्ताईनगर पो.स्टे
घानखेडा : बोदवड पो.स्टे
कोट....
रविवारपासून जिल्ह्यात ११ ठिकाणी तात्पुरते तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. तेथे एक दुय्यम अधिकारी व आठ कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील व्यक्तीही बाहेर जाणार नाही. अतिशय गंभीर कारण असेल तरच बाहेर जाता येईल, त्यासाठीही ई पास घ्यावा लागणार आहे.
- डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक