चाळीसगाव दि. ७ : बेलगंगा साखर कारखान्याच्या लिलावात भरलेल्या ४० कोटी रुपयांमधून औरंगाबाद खंडपिठाच्या आदेशान्वये कर्मचा-यांच्या पीएफसाठी अकरा कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती माजी चेअरमन चित्रसेन पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.बेलगंगा साखर कारखाना जिल्हा बँकेकडून लिलाव प्रक्रियेद्वारे लोकसहभागातुन विकत घेतल्यानंतर कामगारांचा पीएफ, थकीत वेतन याबाबतचा मुद्दा ऐरणीवर आला होता. बँकेने पीएफचे पैसे भरावे यासाठी कामगारांनी औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल करुन लढा सुरु ठेवला आहे. न्यायालयाने बँकेला कामगारांच्या पीएफचे अकरा कोटी रुपये भरण्याबाबत निर्देश दिल्यानंतर लिलावाच्या ४० कोटी रुपयांमधुन अकरा कोटी रुपये अनामत म्हणून भरले गेले आहेत. यामुळे कामगारांच्या पीएफची देणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.ही प्रक्रिया १ रोजी पार पडली असून यामुळे कामगारांच्या पीएफला सुरक्षा मिळाली आहे. रविवारी केडीओ हॉल मध्ये सकाळी ११ वाजता कामगारांसाठी बैठक आयोजित करुन त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. कामगारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन चित्रसेन पाटील यांनी दिली.
५०० स्थानिक कामगारांना रोजगारपुढच्या गळीत हंगामात कारखाना सुरु होईलच. ज्या निवृत्त कामगारांना पुन्हा काम करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासह नविन ५०० स्थानिक कामगारांना रोजगार मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी दिलीप रामराव चौधरी, प्रेमचंद खिंवसरा, रवींद्र केदारसिंग पाटील, दिनेश पटेल, विजय अग्रवाल, विनायक वाघ, डॉ.अभिजीत पाटील, अशोक ब्राम्हणकार, किरण देशमुख, निशांत मोमया, हार्दीक लोढा, श्रीराम गुप्ता, डॉ. अभिजीत पाटील, डॉ. मुकूंद करंबेळकर, निलेश निकम, राजेंद्र धामणे, अजय शुक्ल, यु.डी.माळी, नीलेश वाणी, शरद मोराणकर, सुशील जैन उपस्थित होते...'लोकमत' मालिकेची दखललोकमतने 'बेलगंगा आशा-अपेक्षा' ही वृत्त मालिका सुरु करुन कारखान्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. यात कामगारांच्या पीएफचा मुद्दा विस्ताराने आणि स्पष्टपणे मांडला होता. याचीही दखल घेतल्याचे पत्रपरिषदेत चित्रसेन पाटील यांनी सांगितले.