लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ११०० पेक्षा अधिक म्हणजे ११८३ नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर १३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात चार रुग्ण हे ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यात नियमित होणारे मृत्यूही वाढले असल्याने चिंता अधिकच वाढली आहे.
जळगाव शहरात २६४, चोपड्यात १९५, एरंडोलमध्ये १२२, भुसावळात १४३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. मृतांमध्ये जळगाव शहरातील तीन बाधितांसह १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पूर्ण कक्ष व पूर्ण अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आले असून, हे तात्काळ फुल्ल झाले असल्याचेही सांगण्यात आले. काही कक्षांमध्ये महिला रुग्णांसाठी बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.
लॉकडाऊनचा विचार करावा लागेल : जिल्हाधिकारी
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांची वाढती आकडेवारी बघता प्रशासन लॉकडाऊनचा गांभीर्याने विचार करत आहे; मात्र सध्या चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णसंख्यादेखील वाढली आहे, तसेच पॉझिटिव्हिटी रेट हा १२ ते १५ टक्क्यांच्या मध्ये असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.