लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने व ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना पदक मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी रविवारी हॉकी जळगाव व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल १११ मीटर लांब तिरंगा रॅली काढण्यात आली. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह खेळाडूंनी रॅलीत सहभाग नोंदविला होता. भारतमाता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी शहर दुमदुमले होते.
सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. त्याआधी ध्वजास मानवंदना देण्यात आली. नंतर १११ मीटर लांबीचे व ३० मीटर रुंदीचा भारतीय तिरंगा हॉकी, फुटबॉल खेळाडूंनी तसेच इतर संघटनेचे पदाधिकारी यांनी आपल्या खांद्यावर घेऊन रॅली काढली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक, शास्त्री टॉवरमार्गे चित्रा टॉकीज व नंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीत हॉकी प्रशिक्षक अरविंद खांडेकर, खो-खो प्रशिक्षक मीनल थोरात, अॅथलेटिक्स प्रशिक्षक व तालुका क्रीडा अधिकारी नॉर्थ दमाई, कर्मचारी विनोद कुलकर्णी व विनोद माने यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, मनियार व सिकलगर बिरादरीतर्फे मार्गात तिरंगा रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅली काँग्रेस भवनजवळ आल्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, जमील शेख आदींची उपस्थिती होती. समारोप कार्यक्रमात अनुभूती स्कूलचे क्रीडा शिक्षक संजय पाटील, प्रवीण ठाकरे यांनी खेळाचे महत्त्व सांगितले. हॉकी प्रशिक्षक सय्यद लियाकत अली यांनी सूत्रसंचालन केले व आभार सत्तू पवार यांनी मानले. प्रास्ताविक मुजफ्फर शेख यांनी केले.
रॅलीत यांचा होता सहभाग
या रॅलीमध्ये फारूख शेख, अनिता कोल्हे, दीपक आरडे, विवेक अळवणी, राष्ट्रीय खेळाडू सुनयना राजपाल, हर्षाली पाटील व गार्गी ठाकरे, अरविंद खांडेकर, मीनल थोरात, विनोद माने तर मुजाहीद काझी, ऋग्वेद चौधरी, कृष्णा राठोड, देव पांडे, धीरज जाधव, शुभम सोनवणे, पूर्वेश महाजन, पंकज बारी आदींची उपस्थिती होती.