जळगाव : पोलीस गस्त असो किंवा घटना, घडामोडीच्यावेळी तात्काळ घटनास्थळावर पोहचण्यासाठी पोलिसांना वाहनाची गरज असते, बऱ्याच वेळा ऐनवेळी वाहन उपलब्ध होत नाही किंवा वाहनाची अवस्था पाहता मध्येच काही तरी अडथळे निर्माण होतात. ही समस्या आता दूर होणार असून पोलीस दलाच्या ताफ्यात नव्या १४ वाहनांची भर पडणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून एक कोटी रुपयांचा निधीही पोलीस दलाला मिळालेला आहे.
ही वाहने खरेदी करण्यासाठी पोलीस दलाने जी.एम.पोर्टलवर ऑर्डरही दिली आहे. एका वाहनाची किंमत ७ लाख ९ हजार ४३० रुपये इतकी आहे. बीएस-६ चे वाहन उत्पादन थांबल्यामुळे वाहन खरेदीही रखडली आहे, मात्र येत्या काही दिवसात या १४ गाड्या पोलिसांच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती मोटार वाहन विभागाचे पोलीस निरीक्षक एस.एस.मोहीते यांनी दिली.
सद्यस्थितीत पोलीस दलाकडे १७४ चारचाकी असून त्यापैकी १४८ चारचाकी वापरात आहेत तर २६ वाहने स्क्रॅपमध्ये जाणारी असल्याने ती वापरात नाहीत. दुचाकींचीही संख्या १६४ इतकी आहे, त्यापैकी ७६ दुचाकी वापरात असून ८८ दुचाकी स्क्रॅपमध्ये जाणार आहेत. त्यासाठी शासनाकडून एप्रिल महिन्यात आदेश येऊ शकतात. या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे. पोलीस दलात एका वाहनाची मर्यादा १० वर्ष किंवा दोन लाख कि.मी. अशी आहे. जीपला अडीच लाख कि.मी तर दुचाकीला ३ लाख कि.मी.ची मर्यादा आहे. त्यातही एखाद्या वाहनाची स्थिती चांगली असली तर ते वाहन आणखी काही वर्ष वापरात ठेवता येऊ शकते.
कोट...
डीपीडीसीतून एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून १४ वाहने खरेदी केली जाणार आहेत. सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर वाहनांची बुकींगही झाली आहे. येत्या काही दिवसात ही वाहने मिळतील. स्क्रॅप वाहनांबाबत शासनाचे आदेश आल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल.
-एस.एस.मोहिते, पोलीस निरीक्षक, मोटार वाहन विभाग
अशी आहे पोलीस दलाकडील वाहनांची स्थिती
एकूण चारचाकी : १७४
एकूण दुचाकी :१६४
स्क्रॅपमध्ये जाणाऱ्या चारचाकी : २६
स्क्रॅपमध्ये जाणाऱ्या दुचाकी : ८८
चालु स्थितीत चारचाकी : १४८
चालु स्थितीत दुचाकी : ७६
नवीन येणाऱ्या चारचाकी : १४