जळगाव : शिक्षण हक्क कायद्यांर्गत (आरटीई) २५ टक्के अंतर्गत राबवण्यात येणा-या प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची अंतिम मुदम मागील आठवड्यातच संपली. त्यामुळे आतापर्यंत एकूण ३५९४ जागांपैकी २४५४ जागांवर विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. यामुळे पहिली फेरी व प्रतीक्षा यादी झाल्यानंतर आता जळगाव जिल्ह्यात अजून आरटीईच्या ११४० जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी मुदतवाढ देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यात आरटीई प्रवेशांसाठी २८७ शाळांनी नोंदणी केली असून एकूण ३५९४ जागा उपलब्ध आहेत. यंदा संपूर्ण राज्यात प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी एकाच वेळी ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आली होती. त्यानुसार १७ मार्च २०२० रोजी पहिली सोडत काढण्यात आली होती. दरम्यान, आरटीईतंर्गत प्रवेश मिळावा म्हणून जिल्हाभरातून ८ हजार ४६३ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यामधून पहिल्या सोडतीमध्ये ३ हजार ३४१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. २ हजार २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली़ त्यानुसार आता एकूण जागेच्या २४५४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. अजूनही आरटीईच्या ११४० जागा रिक्त आहेत. त्यामुळे यंदाही दरवर्षी प्रमाणे जागा रिक्त राहण्याची परंपरा कायम राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. अद्याप प्रवेश निश्चितीसाठी कुठलीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. मात्र, जादा जागा रिक्त असल्यामुळे पुन्हा प्रवेशाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
- चार्ट
एकूण शाळा - २८७
आरटीई जागा - ३५९४
एकूण अर्ज - ८४६३
पहिल्या सोडतीत निवड विद्यार्थी - ३३४१
तात्पुरते प्रवेश - २४९९
प्रवेश निश्चित - २४५४