ऑनलाईन लोकमत
चोपडा,दि.23- ठेवीची मुदत संपूनही ठेवीदारांना रक्कम परत न करता, ठेवीदारांची 71 लाख 64 हजार 690 रूपयांचा अपहार करून, फसवणूक केल्याप्रकरणी भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर)मल्टीस्टेट को.ऑप सोसायटीचे चेअरमन प्रमोद भाईचंद रायसोनी यांच्यासह 14 आरोपींना सीआयडीच्या पथकाने सोमवारी अटक केली. त्याची रवानगी जळगाव कारागृहात करण्यात आली आहे.
ठेवीदाराच्या फसवणुकीप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला 31 मे 2015 रोजी 16 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणी 14 जणांना चोपडा येथे आणत अटक करण्यात आली.
फिर्यादी जगन्नाथ ङिापरू पाटील (72, रा. गुरूदत्त कॉलनी चोपडा) यांच्यासह 31 जणांनी बीएचआरच्या चोपडा शाखेत संजीवनी ठेव योजनेंतर्गत मुदत ठेव 13 टक्के व्याजदराने ठेवली होती. मुदत संपुनही ठेवीची रक्कम व्याजासह परत न करता, 71 लाख 64 हजार 690 रूपयांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी प्रमोद भाईचंद रायसोनी (54, जळगाव), दिलीप कांतीलाल चोरडिया (52,तळेगाव) सुरजमल बभूतमल जैन (51, तळेगाव ) दादा रामचंद्र पाटील (68,शेळगाव), भागवत संपत माळी (65,तळेगाव), मोतीलाल ओंकार जिरी (47, शेळगाव), राजाराम काशिनाथ कोळी (48, तळेगाव) , भगवान हिरामण वाघ (62, तळेगाव) , डॉ. हितेंद्र यशवंत महाजन (53, जळगाव) , इंद्रकुमार आत्माराम ललवाणी (41, जळगाव) , यशवंत ओंकार जिरी (62, शेळगाव) , शेख रमजान शेख अब्दुल नबी (58,तळेगाव) सुकलाल शहादू माळी (47, तळगाव), ललिताबाई राजू सोनवणे (42,रा. तळेगांव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.