कुंदन पाटील
जळगाव : शेळगाव बॅरेजमधील जलसाठा १०० टक्के क्षमतेने उपलब्ध व्हावा, यासाठी गेल्या १३ वर्षांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांना काहीसे यश आले आहे. या प्रकल्पात असणाऱ्या ११.९५ हेक्टर वनजमीन अधिग्रहित करण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे.त्यानुसार या वनजमिनीच्या अधिग्रहणासाठी हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या वनविभागाकडे पाठविण्यात आला आहे. केंद्राकडून हिरवा कंदिल मिळताच शेळगाव प्रकल्पातील जलसाठा १०० टक्के क्षमतेने भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सरदार सरोवर प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीपोटी केंद्र सरकारने भुसावळच्या सातारा परिसरातील जमीन संपादित केली होती. वनजमिनीच्या जागेपायी शेळगाव धरणातील जलसाठा पूर्ण क्षमतेने भरताना मोठी अडचण निर्माण होत गेली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ही वनजमीन संपादित करण्यासाठी २०११ पासून प्रयत्न सुरु केले होते. मात्र राज्य शासनाने या प्रस्तावाला फारसे गांभिर्याने घेतले नाही. त्यानंतर ऑगस्टमध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सिंचन विभागाची बैठक घेतली. त्यात या प्रस्तावावर चर्चा झाली. प्रसाद यांनी नव्याने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला. प्रसाद यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत वनजमिनीमुळे जिल्ह्यातील जलसिंचन क्षमतेविषयी अडचण निर्माण होत असल्याची जाणीव करुन दिली.त्यानुसार राज्य शासनाने वनविभागाची ११.९५ हेक्टर जमीन या प्रकल्पाला मिळावी, यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आणि दि.२५ ऑक्टोबर रोजी हा प्रस्ताव नागपूरच्या केंद्रीय वनविभागाच्या कार्यालयाकडे पाठविला. शुक्रवारी सायंकाळी हा प्रस्ताव नवीदिल्ली येथे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
काय फायदा होणार?तापी नदीवर शेळगाव बॅरेज हा मध्यम प्रकल्प असून तो जळगाव शहराच्या उत्तरेस १८ किमी अंतरावर शेळगाव गावाजवळ आहे. १०० टक्के सिंचन क्षमता झाल्यास यावल तालुक्यातील ९१२८ हेक्टर शेत जमिनच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. जळगाव व भुसावळ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, खाजगी औद्योगिक वसाहती, खाजगी उद्योग, भुसावळ शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी, भुसावळ रेल्वे जंक्शन व इतर रेल्वे वसाहतींसाठी, धरणाच्या आसपास असलेल्या जळगाव, भुसावळ व यावल तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठी शाश्वत स्रोत व मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.