कुंदन पाटील
जळगाव : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तालुक्यातील ६ प्रकरणे मंजूर करण्यात आले असून संबंधित अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाखांचा धनादेश वाटप पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले.
रंजना पाटील (कडगाव), कविता धनगर (नंदगाव), चंद्रकला कोळी (विदगाव), सरला काटे (सुजदे), तिलोत्तमा अत्तरदे (भादली खु.) व रुक्माबाई कुंभार (तरसोद) अशी या लाभार्थ्यांची नावे आहेत.अजिंठा विश्रामगृहावर हा कार्यक्रम झाला.भौगोलिक मानांकन स्थानिक वाणाची ओळख अंतर्गत जळगाव तालुक्यातील ३७६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांनाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पीक स्पर्धेत विनोद पाटील अव्वल
कृषी विभागाने सन २०२१-२२ या वर्षात पिक स्पर्धेचे आयोजन केले होते. यात जिल्हास्तरावर ३० व तालुका स्तरावर ३० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.त्यातून जिल्हा स्तरावर प्रथम - विनोद पाटील (नशिराबाद), द्वितीय- आधार चौधरी (आव्हाणे), तृतीय - ज्ञानेश्वर चौधरी (आव्हाणे) तर जळगाव तालुकास्तर प्रथम- राजेंद्र पाटील (गाढोदा), द्वितीय -डिगंबर चौधरी, व तृतीय - राजेश वाडेकर (बिलखेडा) यांना यावेळी बक्षीसाच्या रकमेचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
नगरसेवक मनोज चौधरी, आत्मा कमिटीचे पी के. पाटील, तालुका कृषी अधिकारी एस. जे. राऊत, मंडळ अधिकारी एम. के. वालदे, एम. जी. जंगले, बाळू अहिरे, नानासाहेब सूर्यवंशी, जितू नारखेडे, भूषण पाटील, गजानन पाटील, संजय पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी एस. जे. राऊत यांनी तर सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक सचिन बाविस्कर यांनी केले. आभार आत्मा कमिटीचे अध्यक्ष पी. के. पाटील यांनी मानले.