पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील पोलीस पाटलांच्या पदे रिक्त असलेल्या २७ गावांच्या नवीन पोलीस पाटील भरतीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. निवड प्रक्रियेत सत्ताविसपैकी केवळ निम्मे म्हणजे बाराच गावांचे उमेदवार या प्रक्रियेत उत्तीर्ण झाले असून, त्यात चार महिलांचा समावेश आहे. या उमेदवारांची पोलीस पाटीलपदी नियुक्ती करण्यात येणार आहे.तालुक्यातील २७ गावातील पोलीस पाटील पदासाठी मार्च महिन्यात एरंडोल येथे प्रांत कार्यालयात आरक्षण जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर जुलै महिन्यात या पदांसाठी जळगाव येथे ८० गुणांची लेखी परीक्षा व १३ आॅगस्ट रोजी मुलाखत घेण्यात आली. मात्र अनेक गावातून पात्र उमेदवार उपलब्ध नसल्याने व काही गावातून एकही अर्ज दाखल न झाल्याने उर्वरित गावातील पोलीस पाटलांची निवड करण्यात आली नाही. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.पाच गावात एकही अर्ज प्राप्त झाला नाही त्यात उडणीदिगर, तांबोळे, उत्रड, सोके, जामदे या गावांचा समावेश आहे.नऊ गावांमध्ये पात्र उमेदवार उपलब्ध झाले नाहीत. त्यात टेहू, बोळे, पुनगाव, विटनेर, विटवे, टिटवी तांडा, दळवेल, तरवाडे खुर्द, बाभळेनाग या गावांचा समावेश आहे.तालुक्यातील या १२ गावांना मिळाले नवीन पोलीस पाटीलमहाळपूर- चंद्रकांत रामदास आहिरे, वाघरे- भाऊसाहेब आत्माराम हटकर, वाघरी- भाऊसाहेब भिकारी पाटील, इंधवे-शीतल प्रभाकर पाटील, हिरापूर- सुलोचना शाळीग्राम पाटील, पळसखेडा खुर्द- पंकज रावण पाटील, पळसखेडा बुद्रूक- मनोज दिलीप निकम, बोदर्डे- समाधान देवसिंग पाटील, ढोली- पंकज देवराम देवरे, करमाड खुर्द- समाधान हंसराज पाटील, आडगाव- सीमा अमृतराव पाटील, करंजी बुद्रूक- कल्पना विलास पाटील तसेच दगडी प्र.अ. येथील उमेदवाराचे कागदपत्र पूर्ण नसल्याने कागदपत्र तपासणीच्या अधीन राहून मुलाखतीस पात्र ठरवलेले आहे. अपात्र झाल्यास पद रिक्त ठेवण्यात येणार आहे. (कागदपत्रांची पूर्तता आठ दिवसांच्या आत करण्याच्या अटीवर ही निवड करण्यात आली आहे.)गावांपैकी काही गावात जाहीर झालेल्या आरक्षणाचा उमेदवारच नसल्याचे एकही अर्ज प्राप्त झाला नाही. तसेच उर्वरित गावांमध्ये उमेदवार लेखी परीक्षा उतीर्ण होऊ न शकल्याने त्यांना मुलाखतीस बोलावण्यात आले नाही व त्या गावातील पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत. निवड झालेल्या पोलीस पाटलांचे तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनकर पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील, तालुका उपाध्यक्ष अशोक पाटील, सचिव सुकलाल पाटील यांनी स्वागत केले.
पारोळा तालुक्यातील १२ गावांना मिळाले नवीन पोलीस पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 4:53 PM