जळगाव : आई, वडील व बहीण यांच्यासोबत घरात मोबाइलमध्ये चित्रपट बघत असताना विषारी नागीणने दंश केल्याने रोहित गुड्डू चव्हाण (वय १२) या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री १२.३० वाजता खेडी शिवारातील माउली नगरात घडली. डोळ्यांसमोर मुलाचा मृत्यू झाल्याने आई, वडिलांनी प्रचंड आक्रोश केला. सोमवारी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह चोपडा तालुक्यातील मूळ गावी नेण्यात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुड्डू चव्हाण हा तरुण बांधकाम व्यावसायिक रमेश चंद्रकांत वानखेडे यांच्याकडे वाॅचमन म्हणून कामाला आहे. वानखेडे यांची खेडी शिवारातील माउली नगरात बांधकामाची साइट सुरू आहे. तेथेच पत्नी संगीता, मुलगा रोहित व एक मुलगी असे चौघे वास्तव्याला होते. रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर सर्व जण मोबाइलमध्ये घरात चित्रपट बघत होते. त्यावेळी रोहित याला काहीतरी चावा घेतल्यासारखे जाणवले. त्यानंतर काही क्षणातच त्याची प्रकृती बिघडली. आपल्याला काहीतरी चावल्याचे त्याने आई, वडिलांना सांगितले. यावेळी त्यांनी त्याला पाणी पाजले. त्याची अवस्था पाहून गुड्डू चव्हाण यांनी वानखेडे यांना कळविले. त्यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले. तेथे १२.३० वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सोनवणे यांनी त्यास मृत घोषित केले. सर्पदंश झाल्याने रोहितचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
घरी गेल्यावर दिसली नागीण
रोहित याचा मृतदेह शवविच्छेदन झाल्यानंतर सकाळी ताब्यात मिळणार असल्याने वानखेडे व त्याचे आई, वडील रात्री घरी गेले असता त्यांना नागीण दिसली. त्यांनी तिला ठार मारले. दरम्यान, सोमवारी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अंमलदार सुनील सोनार व सिद्धेश्वर डापकर यांनी प्राथमिक तपास करून पंचनामा केला व शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.