या संपात विविध बँकांच्या शिपायांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत एकूण दीड हजार जणांनी सहभाग नोंदविला. काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या बँकांसमोर एकत्र येऊन, कुठलेही निदर्शने न करता शांततेच्या मार्गाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला व त्यानंतर घराकडे परतले. दरम्यान, संपाच्या पहिल्या दिवशी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे समन्वयक स्वप्निल मोरडे, अभिलाष बोरकर यांच्यासह कर्मचारी कैलास तायडे, विजय सपकाळे, संदीप धर्माधिकारी, अशोक देवरे, प्रसाद पाटील, माखनलाल सोनी, तसेच इंडियन ओवरसीस बँकेचे योगेश पाटील व जितेंद्र राय उपस्थित होते.
इन्फो :
या कारणांमुळे बँकांचा खासगीकरणाला विरोध -
- केंद्र शासनाच्या प्रस्तावित बँक खासगीकरणामुळे ग्रामीण भागातील शाखा कमी होऊन, तेथील जनतेला बँक सुविधांपासून वंचित राहावे लागेल.
- कृषी व कृषिपूरक उद्योगांच्या वित्त पुरवठ्यामध्ये घट होईल.
- लघू व मध्यम व्यावसायिकांना कर्जपुरवठा मिळण्यास अडचणी येतील.
- गरजू विद्यार्थांना शैक्षणिक कर्ज मिळण्यात घट होईल.
- बँक खासगीकरण म्हणजे मोठ्या-मोठ्या उद्योजकांना स्वस्त व्याजदरात कर्जपुरवठा.
- बँक खासगीकरण म्हणजे जास्तीतजास्त छुपे कर.
- खासगीकरणामुळे नागरिकांना ठेवींची मोठी जोखीम स्वीकारावी लागणार.
- बँक खासगीकरणातून राष्ट्राच्या संपत्तीचे कवडीमोल भावात मोठ्या कॉर्पोरेट्सला विक्री.
- स्थायी नोकऱ्यांवर गदा येऊन कंत्राटी पद्धतीने नोकर भरती व त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे शोषण.
- खासगीकरणामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना कमीतकमी कर्ज पुरवठा.
इन्फो :
सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोध
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे बँक कर्मचाऱ्यांना एकत्र येऊन घोषणाबाजी, निदर्शने, तसेच रॅली काढण्याला परवानगी नाकारली होती. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या निर्देशानुसार सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोध प्रदर्शन केले. यासाठी ‘ट्विटर’वर ‘बँक बचाओ, देश बचाओ’ ही मोहीमही चालविली. यामध्ये हजारो बँक कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
इन्फो :
या संघटनांनी संपात घेतला सहभाग
बँकाच्या या दोन दिवसीय संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बॅंक एम्प्लॉइज, ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स व बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटना संपात सहभागी झाल्या होत्या.
इन्फो :
नागरिकांची एटीएमवर धाव
बँकांच्या दोन दिवसीय संपामुळे व्यापारी व उद्योजकांच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम होणार असून, इतर नागरिकांच्या व्यवहारावरही परिणाम होणार आहे. चेक क्लीअरिंगसहव इतर आर्थिक व्यवहार मिळून दोन दिवसांत १२३ कोटींचे व्यवहार ठप्प होणार आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांनी तात्पुरती पैशांची अडचण दूर करण्यासाठी शहरातील विविध एटीएमवर सकाळपासून गर्दी केलेली दिसून आली. बँकांकडूनही एटीएममध्ये पैशांचा पुरेशा भरणा करण्यात आला असल्यामुळे, नागरिकांची काहीशी गैरसोय टळणार असल्याचे दिसून येत आहे.