जळगाव : जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर २०२० या नऊ महिन्यात ८३३ महिला व ४५८ पुरुष असे एकूण १,२९१ महिला-पुरुष घरातून गायब झाले आहे. त्यापैकी ३५३ महिला व २०५ पुरुष शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्यापही ७३३ महिला, पुरुष पोलीस रेकॉर्डनुसार गायबच असून, विविध पोलीस ठाण्यात त्यांच्याबाबत हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गायब होण्यामागे प्रेमप्रकरण, कुटुंबातील ताणतणाव व नैराश्य ही तीन प्रमुख कारणे असल्याचेही समोर आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १८ वर्षांआतील मुलगा, मुलगी घरातून पलायन किंवा निघून गेले असतील तर त्यांच्याबाबतीत हरविल्याची नोंद न करता अपहरणाचा गुन्हा दाखल होतो व १८ वर्षांवरील तरुण, तरुणी, महिला, पुरुष यांच्याबाबतीत हरविल्याची नोंद होते. अगदी प्रेमप्रकरणातूनही पलायन केलेले असले, तरी हरविल्याची नोंद होते. जिल्ह्यात १९ ते ३० वर्ष वयोगटातील ५५१ महिला, १२६ पुरुष घरातून निघून गेलेले आहेत तर ३१ ते ४५ वयोगटातील २३० महिला व १८७ पुरुष तर ४६ वर्षावरील ५२ महिला व १४५ पुरुष घरातून निघून गेलेले आहेत. त्यापैकी १९ ते ३० वयोगटातील २४६ महिला ६२ तरुणांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. ३१ ते ४५ वयोगटातील ८७ महिला व ७९ पुरुष सापडले असून, ४६पेक्षा जास्त वयोगटातील २० महिला व ६४ पुरुष सापडले असून, त्यांची पोलिसात नोंद करण्यात आली आहे. कुटुंबातील सासू-सून, मुलगा किंवा इतर वादातूनही अनेकांनी घर सोडले आहे.
विवाहित महिलांची संख्या अधिक
घरातून पलायन केलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या विवाहित महिलांची असून, त्यांनी पोटच्या गोळ्यांना सोडून प्रियकरासोबत पलायन केले आहे. बहुतांश प्रकरणात विवाहित महिलांसोबत पलायन करणारा तरुण हा अविवाहितच आहे. मोजक्याच प्रकरणात विवाहित महिला व विवाहित पुरुष आहेत. दोघांनीही एकमेकांच्या जोडीदाराला सोडून पलायन केल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकरणात लहान मुले वाऱ्यावर तर काही प्रकरणात महिलांनी मुलांना सोबत नेले आहे. अपवाद फक्त दोन ते पाच टक्के प्रकरणांमध्ये पलायन केल्यानंतरही पतीने पत्नीचा स्वीकार केला असून, त्यामागे मुले व आई-वडिलांचा सांभाळ ही कारणे आहेत.
दृष्टीक्षेपात हरविलेले
महिला पुरुष
८३३ ४५८
दृष्टीक्षेपात सापडलेले
महिला पुरुष
३५३ २०५