आॅनलाईन लोकमत,
जळगाव-दि.२,अंतराळात परिभ्रमण करताना ‘स्विफ्ट-टटल’ हा धुमकेतू ११ ते १३ आॅगस्ट दरम्यान पृथ्वीच्या कक्षेच्या जवळून जाणार आहे. त्यामुळे १२ आॅगस्ट रोजी इतिहासातला सर्वात मोठा उल्का वर्षाव होण्याची शक्यता आहे. ‘नासा’च्या अनुमानानुसार ११ ते १३ आॅगस्ट दरम्यान दर तासाला १५० ते २०० उल्का पृथ्वीच्या कक्षेत कोसळणार असल्याची माहिती खगोलतज्ज्ञ सतीश पाटील यांनी दिली.
पृथ्वीवर दररोज उल्का वर्षाव होत असतो. रात्रीच्या वेळेस उल्कांचा वर्षाव अनेकदा पहायला मिळतो. रोजच्या उल्का वर्षावामुळे पृथ्वीचे वस्तूमान रोज हजारो टनांनी वाढत आहे. पृथ्वीभोवती भ्रमण करीत असताना ‘स्विफ्ट-टटल’ हा धमकेतू पृथ्वीच्या कक्षेतून जात असल्याने उल्का वर्षाव होणार आहे. १२ आॅगस्टची रात्र जगभरातील खगोल प्रेमींसाठी मोठी पर्वणीची ठरणार आहे.
शहरातील खगोलप्रेमींना उल्कावर्षाव पाहण्याची संधीशहरातील खगोलतज्ज्ञ सतीश पाटील यांनी उल्का वर्षाव पाहण्यासाठी खास व्यवस्था केली आहे. संगणकीय प्रणाली जोडलेल्या स्वयंचलित जीपीएस प्रणाली असलेल्या स्टॅण्डला कॅमेरा जोडून छायाचित्रण केले जाणार आहे. रेडिओ तरंगाच्या मदतीने उल्कांचे निरीक्षण केले जाणार आहे. तसेच चारही दिशेला चार निरीक्षक बसवून उल्कांच्या नोंदी ठेवल्या जाणार असल्याची माहिती सतीश पाटील यांनी दिली आहे. तसेच सर्व नोंदी या आंतराष्टÑीय उल्का अभ्यास मंडळाकडे पाठविण्यात येणार आहेत.