भडगाव - तालुक्यातील मळगाव शिवारात शेडमध्ये बांधलेल्या शेळयांवर लांडग्यांच्या झुंडीने केलेल्या हल्ल्यात एकुण १३ शेळया फस्त केल्या. ही घटना २४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या आधी दोन दिवसांपुर्वीही लांडग्याने केलेल्या हल्यात २ शेळया ठार झाल्या होत्या.आतापर्यंत अशोक दयाराम सोनवणे या शेतकऱ्याच्या एकुण १५ शेळया लांडग्यांनी फस्त केल्याने सुमारे ६० हजारांचे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागाने तात्काळ नुकसानीची पाहणी करुन भरपाई दयावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.शेतातील शेडमध्ये त्यांच्या शेळया बांधलेल्या होत्या. घटना घडली तेव्हा पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या व अशोक सोनवणे हे गावात घरी जेवणाला गेले होते. शेतात दुपारी आल्यावर लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात एकुण १३ शेळया मृत अवस्थेत पडलेल्या त्यांना दिसुन आल्या. ही घटना पाहताच या शेतकºयाने मदतीसाठी आरडाओरड केली. हा आवाज ऐकूण शेजारील शेतकरी मदतीसाठी धावत आले. परंतु पशुधनाचे मोठे नुकसान झालेलेच होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. तर शेतकरी व पशुमालकात भितीचे वातावरण पसरलेले आहे. पशुवैदयकीय अधिकाऱ्यांनी मृत शेळयांचे विच्छेदन केले.
मळगाव येथे लांडग्यांच्या हल्ल्यात १३ शेळया फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 5:28 PM