लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आरोग्य यंत्रणेतील काही रुग्णवाहिका नादुरुस्त असल्यामुळे २५ रुग्णवाहिकांची मागणी जिल्हा आरोग्य विभागाने शासनाकडे केली होती. त्या पैकी १३ रुग्णवाहिका या जिल्ह्यात दाखल झाल्या असून, त्यापैकी ८ रुग्णवाहिका या आता विविध आरोग्य केंद्रांच्या सेवेत राहणार आहेत. लवकरच तांत्रीक बाबी दूर केल्यानंतर त्यांचा वापर केला जाणार असल्याची माहिती आहे. रुग्णवाहिका प्राप्त झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून नादुरूस्त रुग्णवाहिकांचा मुद्दा समोर आला होता. त्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून आरोग्य सेवा संचालकांकडे ही मागणी आरोग्य विभागाने केली होती. आता जिल्हाभरात प्रत्येक आरोग्य केंद्रांना एक रुग्णवाहिका असल्याचे डॉ. जमादार यांनी सांगितले. दरम्यान, नवीन आलेल्या रुग्णवाहिकांपैकी ५ रुग्णवाहिका या ग्रामीण रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.
या आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका
मांडळ, वैजापूर, अडावद, कजगाव, उंबरखेड, रांजणगाव, वाकोद, लोहारा या आरोग्य केंद्रांच्या नावानेच या रुग्णवाहिका जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. त्यांचे लोकार्पण होऊन त्यासेवेत येणार असल्याची माहिती आहे.