लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नाही. पॉझिटिव्ह येणाऱ्यांसह मृत्यूचे प्रमाणही वाढते आहे. अशात संचारबंदी व नाइट कर्फ्यूचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन करीत रात्रीच्या वेळी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची पोलीस व आरोग्य विभागाकडून रस्त्यावरचं अँटिजन चाचणी केली जात आहे. गेल्या चार दिवसांत विनाकारण फिरणारे १३३ नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना उपचारार्थ कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.
३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी व नाइट कर्फ्यूचे आदेश १४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत, तरीही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर फिरत आहेत. त्यांच्यावर निर्बंध आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी संपूर्ण जिल्ह्यात दररोजी रात्री आठ वाजल्यापासून तपासणी सुरू केली. यात रस्त्यावर पोलिसांच्या पथकासोबत डॉक्टर, मदतनीस देण्यात आले आहेत. रात्री आठ वाजल्यापासून जिल्हाभरात पेट्रोलिंग, फिक्स पॉइंट येथे पोलिसांकडून अँटिजन तपासणी करण्यात येत ओहत. विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजन टेस्ट करून पॉझिटिव्ह आल्यास रुग्णांना तत्काळ कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात येत आहेत. गेल्या चार दिवसांत एकूण २ हजार ६९७ नागरिकांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात पॉझिटिव्ह आलेल्या १३३ रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस दलाकडून कळविण्यात आली आहे.