लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहर व इतर जिल्ह्यात महिलांच्या सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून आकाश ज्ञानेश्वर सूर्यवंशी (रा. प्रजापत नगर), अमोल ऊर्फ रामेश्वर राजेंद्र अहिरे (विठ्ठल पेठ), दीपक शिवराम भंडागे (रा. ज्ञानदेव नगर) या तिघांना अटक तर सागर राजेंद्र चौधरी (रा.जुने जळगाव) याला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल १८ गुन्हे उघडकीस आले असून त्यातील १३९ ग्रॅम वजनाच्या सोनसाखळ्या हस्तगत करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
सोनसाखळी चोरल्यानंतर त्या कमी किमतीत विकत घेणारा सराफ व्यावसायिक दीपक शिवराम भडांगे (रा. ज्ञानदेव नगर) यालाही आरोपी करण्यात आले आहे. दुसरा एक सराफा मोहन घाटी हा मयत झालेला आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेल्या तीन महागड्या दुचाकीही जप्त करण्यात आलेल्या आहेत. २०२० या वर्षात अखेरच्या महिन्यात सोनसाखळी चोरीच्या तब्बल २० घटना घडल्या होत्या व त्यापैकी एकही घटना उघडकीस न आल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नियुक्त केले होते. आकाश व सागर हे सोनसाखळी चोरी करून पुण्यात पलायन करीत असल्याची माहिती कॉन्स्टेबल परेश महाजन या कर्मचाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी उपनिरीक्षक सुधाकर लहारे, रवींद्र गिरासे, सहायक फौजदार विजय देवराम पाटील, हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील यांचे पथक पुण्याला रवाना केले होते. सलग दोन महिने पाळत व पुरावे गोळा करून या पथकाने पुण्यातून आकाश याला अटक केली.
दोघांना जळगावातून अटक
आकाश याला ताब्यात घेतल्यानंतर सोनसाखळी चोरीची कबुली देतानाच अमोल व सागर या दोघांनाही सोबत तिघांनी जळगाव, पुणे, कराड, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा व मुक्ताईनगरात चोरी केल्याचे सांगून चोरलेले दागिने जळगावातच सराफाकडे कमी किमतीत विक्री केल्याची कबुली दिली. त्यावरून सहायक फौजदार अशोक महाजन, सुनील दामोदरे, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, अनिल देशमुख, संदीप पाटील, सुनील दामोदरे, राहुल पाटील, संदीप साळवे, पंकज शिंदे, योगेश वराडे, किरण चौधरी, विनायक पाटील, मुरलीधर बारी, सविता परदेशी, महेश महाजन, गोरक्षनाथ बागुल, जयंत चौधरी व अशोक पाटील यांच्या पथकाने अमोल व सागर यांचा शोध घेऊन अटक केली.