लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपातील मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत मनपाकडून येत्या महासभेत महत्त्वाचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावानुसार ज्या गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरली नाही, तसेच मुदत संपून देखील गाळे खाली केले नाहीत, असे गाळे जप्त करून, ते त्या गाळ्यांचा लिलाव करण्याचा हालचाली मनपाकडून सुरू आहेत. मात्र, मनपाने हा प्रस्ताव सादर करण्याआधी १४ अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांबाबत स्वतंत्र विचार करणे गरजेचे आहे. मनपाने निर्लेखित केलेले भाडे या मार्केटमधील गाळेधारकांना भरणे शक्यच नसून, मनपाने गाळेधारकांना गोळ्या माराव्यात, मात्र गाळेधारक अवाजवी भाडे भरणार नाहीत अशी थेट भूमिका गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी घेतली आहे.
तब्बल ९ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न अजूनही निकाली निघालेला नाही. आता १८ रोजी होणाऱ्या महासभेत मनपा प्रशासन हे गाळे लिलाव करण्याचा प्रस्ताव सादर करणार आहे. अशा परिस्थितीत गाळेधारकांकडून देखील या प्रस्तावाबाबत लोकप्रतिनिधींशी बोलणे सुरू झाले आहे. गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी आमदार सुरेश भोळे यांच्याशी चर्चा करून, १४ मार्केटमधील गाळेधारकांबाबत योग्य भूमिका घेण्याची मागणी केली आहे. यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशीही चर्चा करून, याबाबत शासनाकडून ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
जुन्या भाड्यानुसार दुप्पट आकारणी केली तरी चालेल
अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांच्या प्रश्नी मनपाने नवीन भाडेदरानुसार आकारणी न करता २०१२ च्या जुन्या भाडेप्रमाणी आकारणी करण्याची मागणी गाळेधारकांनी केली आहे. त्या भाड्यात दुप्पटची आकारणी केली तरी चालेल अशी भूमिकाच गाळेधारकांनी घेतली आहे. तसेच आयुक्तांना जे गाळेधारक भाड्याची रक्कम भरू शकत नाही, त्यांचे दर कमी करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर आयुक्तांनी करावा, अशीही मागणी गाळेधारकांनी केली आहे. मनपाने तर गाळेधारकांबाबत अन्यायाची भूमिका घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गाळेधारक संघटनेने घेतला आहे.
डॉ.गुरुमुख जगवाणी यांचे जयंत पाटलांना साकडे
गाळेप्रकरणी शासनाचे धोरण ठरत नसल्याने पुढील दिशा अद्याप निश्चित होत नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जिल्ह्यात आले असता डॉ.गुरुमुख जगवाणी यांनी गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना साकडे घातले आहे. लाखो कुटुंबांचा संसार मनपाच्या व्यापारी गाळ्यांवर अवलंबून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शासनस्तरावर कोणतेही ठोस धोरण निश्चित केले जात नसल्याने आजपर्यंत त्यावर तोडगा निघालेला नाही. गाळेधारकांवर अन्याय होऊ नये यासाठी महाआघाडी सरकारच्या काळात लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी डॉ.जगवाणी यांनी केली आहे.