४५० अर्ज प्रलंबित : दीड हजार वाहने पाठवली परत
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : यंदाच्या लाॅकडाऊनमध्ये ई-पास नसलेल्या दीड हजारांच्यावर वाहनांना सीमेवरुन परत पाठविण्यात आले आहे तर १४ हजार ७४६ जणांना ई-पास नाकारण्यात आला आहे. आतापर्यंत ३५ हजार ५५९ जणांना ई-पास देण्यात आला असून, ४५० जणांचे अर्ज प्रलंबित आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास ई-पास सक्तीचा करण्यात आला आहे. यावेळी ई-पास देण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेकडे सोपविण्यात आली आहे. ई-पास प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली असून, त्यात प्रवासाचे कारण व त्याबाबतचे पुरावे जोडणे आवश्यक आहे. परंतु, ई-पासची प्रक्रिया करताना नागरिक फक्त आधारकार्ड जोडत असून, इतर कोणताही पुरावा जोडला जात नाही, त्यामुळे ई-पास नाकारला जात आहे.
कागदपत्रे व पुरावे जोडले तर एका मिनिटात पास मंजूर केला जात आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या दालनाच्या बाजूलाच ई-पाससाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, सहाय्यक फौजदार नरेंद्र पवार व रवींद्र कापडणे यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्वाधिक ई-पासचे अर्ज नाशिकसाठी येत असून, त्या खालोखाल पुणे व मुंबई शहरांसाठी येत आहेत. दवाखान्याचीच कारणे त्यासाठी दिली जात आहेत.
ई-पाससाठी मेडिकलचेच कारण
ई-पास काढण्यासाठी नागरिकांकडून दवाखान्याची कारणे सांगितली जात आहेत. ही कारणे देताना त्याबाबतचा कुठलाही पुरावा जोडला जात नाही. केवळ आधारकार्ड अपलोड केले जाते, त्यामुळे असे अर्ज नामंजूर होतात.
किती ई-पास दिले - ३५,५५९
प्रलंबित - ४५०
नामंजूर ई-पास - १४,७४६