२१ मे पर्यंत मागविले प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळेत फारशा भौतिक सुविधा उपलब्ध नसतात, हा गैरसमज खोडून काढण्यासाठी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून जळगाव जिल्ह्यातील १४२ उच्च प्राथमिक जिल्हा परिषद शाळांना प्रयोग शाळा साहित्याचा पुरवठा केला जाणार आहे. यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून २१ मे पर्यंत प्रस्ताव सादर करावयाचे आहे.
जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १८२७ शाळा आहेत. या शाळांमध्ये प्राप्त शासन निधीतून किंवा लोकसहभागातून टप्प्याटप्प्याने भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जातात. त्यातील काही शाळांनी नाविन्यपूर्ण व अभिनव उपक्रम राबवून वेगळेपण सिध्द केले आहे. मात्र, तरी सुध्दा खासगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा चांगल्या दर्जाच्या असाव्यात व त्यात विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशाने मानव विकास विभागाच्या योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यातील १४२ शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांना प्रयोग शाळा साहित्याचे वाटप केले जाणार आहे. यासाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
या तालुक्यांमधील आहे शाळा
मानव विकास विभागाच्या योजनेंतर्गत निवड झालेल्या १४२ शाळा या जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील आहे. त्यामध्ये मुक्ताईनगर, बोदवड, चोपडा, एरंडोल, जामनेर, अमळनेर आणि चाळीसगाव या तालुक्यांचा समावेश आहे. येथील शाळांना साहित्याचा पुरवठा होणार आहे.
राबविली जातेय निविदा प्रक्रिया...
पहिली ते सातवी उच्च प्राथमिक शाळांना प्रयोग शाळा साहित्य पुरवठा करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने राबविली जात आहे. यासाठी २१ मे पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहे.