ममुराबाद : गावातील घरपट्टी, पाणीपट्टी व अन्य करांची थकबाकी सुमारे एक कोटी ३५ लाख रुपयांपर्यंत गेल्यामुळे ग्रामपंचायत काही वर्षांपासून खूपच हतबल झाली आहे. दरम्यान, थकीत करांच्या वसुलीसाठी सर्व ग्रामस्थांना विशेषतः घरपट्टी कराच्या रकमेत १५ ते २० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीकडून दरवर्षी घरपट्टी, पाणीपट्टी व अन्य करांपोटी सुमारे २० लाख रुपयांची आकारणी ग्रामस्थांना केली जाते. त्याबद्दल प्रशासनाकडून रितसर बिलेसुद्धा बजावली जातात. प्रत्यक्षात फारच थोडे ग्रामस्थ नियमितपणे कर भरत असल्याने विविध करांच्या थकबाकीचा आकडा आतापर्यंत एक कोटी ३५ लाख रुपयांच्या घरात गेला आहे. त्यात फक्त घरपट्टीची थकबाकी सुमारे ३१ लाख १५ हजार रुपये इतकी आहे. ग्रामस्थांकडे येणे बाकी असलेल्या करांच्या थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असतांना दिवाबत्ती, सार्वजनिक स्वच्छता, पाणी योजना देखभाल व दुरुस्ती तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन, यासाठी आर्थिक तरतूद करताना ग्रामपंचायतीच्या अगदी नाकीनऊ आले आहेत. विपरीत परिस्थितीवर तोडगा काढून ग्रामपंचायतीची आर्थिक कोंडी सोडविण्याच्या उद्देशाने शेवटी घरपट्टी करातील थकबाकीत काही प्रमाणात सूट देण्याचा ठराव २६ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या मासिक सभेत नवनिर्वाचित सरपंच हेमंत चौधरी यांनी मांडला. त्यास उपसरपंच आशमाबी पटेल व अन्य सर्व सदस्यांनी संमती दर्शविल्यानंतर थकीत घरपट्टी भरणाऱ्यांना १५ टक्के तर नियमित घरपट्टी भरणाऱ्यांना २० टक्के सूट देण्याचे ठरले. विशेष म्हणजे घरपट्टी व पाणीपट्टी करांची एकत्रित बाकी भरणाऱ्यांना ग्रामस्थांनाच सवलतीचा लाभ देण्यात येणार आहे. प्रोत्साहन योजनेची अंमलबजावणी ३१ मार्चपर्यंत होणार आहे.