जळगाव : जिल्ह्यात पूर्वहंगामी लागवड झालेल्या ६० हजार हेक्टर कपाशी पैकी ९० टक्के क्षेत्रावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असून त्वरीत उपाय योजना करण्याच्या सूचना केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ.विश्लेष नगरारे व डॉ.बाबासाहेब फंड यांनी ‘लोकमत’ला दिली. त्वरित उपाययोजना न झाल्यास हा प्रादुर्भाव हंगामी कपाशीवरही होण्याची भिती त्यांनी व्यक्त केली.हंगामी कपाशीवर प्रादुर्भाव नाहीया शास्त्रज्ञांनी मुक्ताईनगर, भुसावळ व जळगाव तालुक्यातील कपाशीच्या पिकांची पाहणी केली. याप्रसंगी कृषी उपसंचालक अनिल भोकरे उपस्थित होते. बुधवारी धुळे जिल्ह्यात पाहणी करणार आहेत. जळगाव जिल्ह्यात मागीलवर्षी मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. मात्र यंदा श्ेतकऱ्यांनी स्वत:हून फेरोमन सापळे लावले आहेत. त्यात बोंडअळीचे पतंग अडकत आहेत. प्रतिदिन ८ याप्रमाणे सलग ३ दिवस पतंग अडकले तर तो प्रादुर्भाव धोक्याच्या पातळीवर असल्याचे समजावे, असेही त्यांनी सांगितले. सध्या पूर्वहंगामी कपाशीवर ५ ते १५ टक्के प्रादुर्भाव झाला आहे. मात्र हंगामी कपाशीच्या रोपांना अद्याप केवळ पानच असल्याने प्रादुर्भाव झालेला नाही. मात्र पूर्वहंगामीचा प्रादुर्भाव त्यांनाही होण्याची भिती असल्याने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे सांगितले.
पूर्वहंगामी कपाशीवर १५ टक्के बोंडअळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 1:55 PM