भडगाव जि. जळगाव : गावाच्या बाजूलाच असलेल्या सात खळ्यांना भीषण आग लागून पंधरा बकऱ्या, बारा बोकड व गायीचा होरपळून मृत्यू झाला. ही भीषण घटना महिंदळे ता. भडगाव येथे सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. दोन तास चाललेल्या अग्नितांडवात लाखो रुपयांचा चारा व शेती साहित्य जळून खाक झाले.
गावाला लागून भगवान नाना पाटील, सुरेश नाना पाटील, सुनील नाना पाटील, वाल्मिक हिरामण पाटील, राजेंद्र भीमराव पाटील, छोटू भीमराव पाटील, प्रशांत बापू पाटील या शेतकऱ्यांनी गुरे, चारा, शेती उपयोगी अवजारे ठेवण्यासाठी पत्र्यांचे शेड बनवले आहेत. या शेडला दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. कामाचे दिवस असल्यामुळे गावकरी शेतात गेलेले होते. आग लागल्याचे लक्षात आले तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. भगवान नाना पाटील यांच्या शेडमध्ये पंधरा बकऱ्या, बारा बोकड होते व शेडला कुलूप असल्यामुळे बकऱ्या व बोकडांचा होरपळून मृत्यू झाला. तर प्रशांत बापू पाटील यांच्या मालकीच्या शेडमध्ये जर्सी गाय होती. ती पण आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.