भूपेंद्र मराठे
पारोळा जि. जळगाव : वन्य प्राण्यांनी मेढ्यांच्या कळपावर हल्ला करुन १५ कोकरुंचा फडशा पाडला तर पाच कोकरु बेपत्ता आहेत. ही घटना दळवेल ता. पारोळा येथे शनिवारी रात्री घडली.
वन कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दळवेल येथील संभाजी नामदेव पाटील यांच्या शेतात उतरलेल्या मेंढ्यांच्या कळपावर पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास वन्यप्राण्यांनी हल्ला चढविला. यात १५ कोकरु जागेवरच ठार झालेले तर पाच कोकरु गायब झालेले आढळून आले. पायांच्या ठशांवरुन हा वन्यप्राणी कोल्हा किंवा लांडगा असू शकतो. धुळे जिल्ह्यातील निमडाळे येथील दादा विठ्ठल टिळे यांचे व बंडू विठ्ठल टिळे यांचे प्रत्येकी पाच तर ज्ञानेश्वर लाला कोळकर यांचे १० कोकरू असे एकूण २० मेंढ्यांचे कोकरू मयत व गायब झालेले आहेत.
वनसंरक्षक रोहिणी सूर्यवंशी, वनसंरक्षक सविता पाटील, वनपाल अनिल बोराडे, वनमजूर नाना संदानशिव, विपुल सोनवणे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पशुधन विकास अधिकारी डॉ. योगेश देशमुख यांनी शवविच्छेदन केले. कोकरुंची अंदाजे किंमत २५ हजार रुपये असावी.
वन्य प्राण्यांच्या हल्यात कोकरू ठार झाल्याच्या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. वरिष्ठांकडे याबाबतचा अहवाल पाठविला जाणार आहे.- श्यामकांत देसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, पारोळा.