लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील चोपडा व यावल तालुक्यालगत असलेल्या सातपुडा वनक्षेत्रात लागलेल्या आगीवर वनविभागातील कर्मचाऱ्यांनी ९० टक्के नियंत्रण मिळवले आहे. चोपडा तालुक्यातील वैजापूर, अडावद व यावल तालुक्यातील मनुदेवी मंदिर परिसर व वाघझिरा, मंडप नालापर्यंत ही आग लागलेली होती. तब्बल पंधरा दिवसांत वनविभागातील केवळ १५० कर्मचाऱ्यांनी कोणतेही आधुनिक साहित्य नसतानादेखील रात्रंदिवस काम करून ही आग विझवण्यात यश मिळविले आहे. तरीही या आगीमुळे सातपुडा वनक्षेत्रांमधील सुमारे १५०० हेक्टरपेक्षा अधिक भाग आगीच्या भक्ष्यस्थानी गेला आहे.
वणवा नियंत्रणासाठी वनविभाग युद्धपातळीवर काम करत असतानादेखील बऱ्याच ठिकाणी दुर्गम भाग, मनुष्यबळाचा अभाव आणि स्थानिकांचा शून्य लोक सहभाग या कारणामुळे वणवा नियंत्रणात अडचणी येत होत्या. तरीदेखील प्रतिकूल परिस्थितीत वनकर्मचाऱ्यांनी ९० टक्के वणवा नियंत्रणात आणला होता. त्या नंतर वन्यजीव संरक्षण संस्थेचे स्वयंसेवक मदतीसाठी उपलब्ध झाले वन्यजीव प्रेमी, सामाजिक संस्थाना लोकसहभागाचे आवाहन करत सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष जाऊन जनजागृती करून स्थानिकांनीदेखील काही प्रमाणात ही आग विझविण्यासाठी मदत केल्याने आता जवळपास सर्वच क्षेत्रांमधील आगीवर नियंत्रण आणण्यात वनविभागाला यश आले आहे. यावल वन्यजीवचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर, मुख्य वनसंरक्षक धुळ्याचे दिगंबर पगार, यावल प्रादेशिक उपवनसंरक्षक पद्मनाभन यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक उपवन संरक्षक अश्विनी खोडपे, वनक्षेत्रपाल अक्षय म्हेत्रे, प्रादेशिक वनक्षेत्रपाल विशाल कुटे यांनी वेळोवेळी बैठका घेत यावल वन्यजीव अभयारण्यातील स्थानिकांना वणवा नियंत्रणात सहभागी करून घेण्यात यश मिळवले आहे.
फायर लाइन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
भविष्यात लागलेली आग ही मोठे स्वरूप घेऊ नये म्हणून वनविभागाकडून सद्य:स्थितीत जंगलांमध्ये फायर लाइन आखण्याचे काम जोरात सुरू आहे. गवताचा मधला भाग जाळून, लागलेला वणवा वाढू नये म्हणून हीच फायर लाइन वनविभागाकडून आखली जात आहे. मनुदेवी, वाघझिरा, अडावद वनक्षेत्र मधील वरगव्हाण, चिंचपाणी या भागातदेखील फायर लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. चोपडा तालुक्यातील वैजापूर भागातील वणवादेखील तीन दिवसांपूर्वीच आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे.
गाव, पाड्यांवर जाऊन केली जातेय जनजागृती
सातपुडा मध्ये लागलेली आग ही निसर्गनिर्मित नव्हती, काही अतिक्रमणधारकांनी व जंगलात डिंक काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून ही आग लावण्यात आल्याची शंका वनविभागाकडून वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, अशा घटना पुन्हा होणार नाही यासाठी वनविभागातील कर्मचाऱ्यांकडून सातपुडा लगत असलेल्या काही गावांसह दुर्गम भागातील काही पाड्यांवरदेखील जाऊन वनविभागातील कर्मचाऱ्यांकडून जनजागृती केली जात आहे. तसेच आग लावणार यांची माहिती वनविभागाला देणाऱ्यांना पाच हजार रुपयांचे बक्षीसदेखील वनविभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
१५० कर्मचाऱ्यांनी लढवला किल्ला
चोपडा ते यावल तालुक्यातील सुमारे दहा ते पंधरा हजार हेक्टर क्षेत्रा लगत याआधीच्या वनवा पेटला होता. वनविभागाकडे कमी असलेले मनुष्यबळ तसेच साधनांची अपूर्णत: असतानाही दीडशे कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केल्याचे आढळून येत आहे. झाडाच्या फांद्याद्वारे ही आग विझवण्यात आली आहे. दरम्यान सातपुडा भागात वाढत जाणारे अतिक्रमण सातत्त्याने लागणाऱ्या आगी व सुरू असलेली वृक्षतोड रोखण्यासाठी वनविभागातील रिक्त जागा भरण्याची मागणी आता पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.
कोट..
सुरवातीपासूनच स्थानिकांच्या संपर्कात होतो. वणवा नियंत्रण करत असतानाच वरिष्ठांच्या मार्गदर्शनात जंगलातील पाड्यांवर जाऊन लोकसहभाग मिळवण्यासाठी बैठका घेतल्या आणि लोकसहभाग वाढवत सद्य:स्थितीत वणव्यांवर १०० टक्के नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. आता जनजागृती आणि फायर लाइनचे कामे करणे तसेच इतर नियंत्रणाचे कामे सुरू आहेत वन्यजीवप्रेमी संस्थांचे सहकार्य लाभत आहे.
-अक्षय म्हेत्रे , वनक्षेत्रपाल यावल वन्यजीव
संपूर्ण महाराष्ट्र वणव्याच्या आगीत होरपळत असताना यावल प्रादेशिक आणि वन्यजीव च्या सर्व वनकर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत युद्धपातळीवर काम करत वणवा नियंत्रणात आणला आहे ही चांगली बाब आहे.
- बाळकृष्ण देवरे, वन्यजीव संरक्षण संस्था