गृहविलगीकरणावर रुग्णांचा भर : ५०० रुग्ण घेताहेत घरीच उपचार; कोविड सेंटर होत आहेत रिकामे
शहरातील एकूण रुग्ण - १७६०
कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेले -२००
घरीच राहून उपचार घेत असलेले रुग्ण - ५६८
खासगी कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण - सुमारे ३००
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग झपाट्याने वाढत असून, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या जिल्हाभरात १० हजारांपर्यंत पोहोचली आहे. जळगाव शहरातदेखील १ हजारपेक्षा अधिक रुग्ण सक्रिय असून, त्यापैकी ५०० हून अधिक रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. तर, महापालिकेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये सद्य:स्थितीत केवळ २०० रुग्ण उपचार घेत आहेत. कोविड सेंटरमध्ये १७०० पैकी तब्बल १५०० बेड खाली आहेत.
दुसऱ्या लाटेत शहरात कोरोना रुग्णांची संख्याही वाढत असताना, महापालिकेने विलगीकरणासाठी उभारलेल्या कोविड केअर सेंटरकडे रुग्णांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी एप्रिलपासून कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर महापालिकेने युद्धपातळीवर उपाययोजना राबविल्या. त्याच वेळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विलगीकरण कक्षासाठी इमारती अधिग्रहीत करून कोविड केअर सेंटर उभारले. त्या ठिकाणी बेडची व्यवस्था करण्यात आली होती. पहिल्या लाटेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमध्ये एकाच वेळी १५०० हून अधिक रुग्ण उपचार घेत होते. मात्र, दुसऱ्या लाटेत केवळ २०० रुग्ण याठिकाणी उपचार घेत असून, रुग्णांचे प्राधान्य गृहविलगीकरणाला दिले जात आहे.
गृहविलगीकरणावर भर
दुसऱ्या लाटेत शहरातील बाधित रुग्णांनी लक्षणे नसतील, तर घरीच उपचार घेण्याचे धोरण अवलंबले आहे. शिवाय, या संसर्गात कुटुंबेच्या कुटुंबे बाधित होत असल्याने एकाच कुटुंबातील सर्व सदस्य रुग्ण असल्यास घरीच उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. लक्षणे असलेले खासगी हॉस्पिटल अथवा ज्या ठिकाणी उपचारांची सुविधा आहे, अशा कोविड सेंटरमध्ये दाखल होत असल्यानेही महापालिका कोविड सेंटर रिकामी पडली आहेत.
गल्लीतील डॉक्टरदेखील देत आहेत कोरोनावर उपचार
पहिल्या लाटेच्या वेळेस लक्षणे नसलेले व अगदीच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना महापालिकेच्या शासकीय तंत्रनिकेतनातील कोविड सेंटरमध्ये भरती केले जात होते. तसेच नागरिकांसह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांमध्येदेखील कोरोनाबाबत भीती होती. त्यामुळे खाजगी दवाखानेदेखील त्यावेळेस बंद होती. मात्र, दुसऱ्या लाटेत नागरिकांसह अनेक खाजगी डॉक्टरांची कोरोनाबाबतची भीती काही अंशी कमी झाली आहे. त्यामुळे अनेक डॉक्टर कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच राहून उपचार देत आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण मनपाच्या सेंटरमध्ये न जाता घरीच राहून उपचार घेत आहेत.