९ रुग्ण आढळले
जळगाव : जिल्हाभरात गुरुवारी बाहेरील जिल्ह्यातील रहिवासी असलेले ९ रुग्ण समोर आले आहेत. त्यांच्यावर जिल्ह्यातच उपचार सुरू करण्यात आले आहे. ही संख्या आता १०६ वर पोहोचली आहे. एकूण १०३६ रुग्णांनी जळगावात उपचार घेतले असून त्यापैकी ९३० रुग्ण बरे झाले आहेत. तर अन्य रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सारीचे १० मृत्यू
जळगाव : सारी किंवा कोरोना संशयित अशा दहा रुग्णांच्या मृत्यूची गुरूवारी नोंद करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून अशा रुग्णांच्या मृत्यूमध्येही वाढ झाली असून सरासरी दहा किंवा त्यापेक्षा अधिक मृत्यू रोज नोंदविले जात आहे. मध्यंतरी ही संख्या १९ पर्यंत गेली होती. त्यामुळे चिंता अधिक वाढली होती.
नातेवाईकांना सूचना
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड रुग्णांजवळ कुठलीच मौल्यवान वस्तू, मोबाईल ठेवू नये, अशा सूचना वैद्यकीय अधीक्षकांनी नातेवाईकांना दिल्या असून याचे एक पत्र रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहे. याची सर्व जबाबदारी ही नातेवाईकांची राहील असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
रेमडेसिविर पुरेसे
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रेमडेसिविर इंजेक्शन सर्व निकष तपासून योग्य पद्धतीने रुग्णांना दिले जात असल्याने रुग्णालयात इंजेक्शनचा तुटवडा भासला नसल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत पुरेसे इंजेक्शन असल्याची माहिती आहे. शिवाय व्यवस्थित वापर असल्याने त्याचे परिणामही सकारात्मक समोर येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.