लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यातील जलसिंचन प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देणार आहोत. त्याचा प्रस्ताव करून राज्यापालांच्या सुत्रानुसार त्याचे वाटप होईल. आणि त्यातील वाटा हा तापीच्या प्रकल्पांमध्ये देणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जळगावात आले आहेत. शनिवारी सकाळी १० वाजता त्यांनी लोकमतच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील शहर कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, काही प्रकल्पांमध्ये केंद्र सरकारचा मागील वर्षभरापासून हिस्सा आलेला नाही. कोरोनाच्या काळात निधी उपलब्ध नसल्याने राज्याचा वाटा देखील कमी राहिला आहे. हा वाटा सध्या भरून काढत आहोत. मोठ्या प्रकल्पांना गती देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अतिरिक्त निधी लागणार आहे. हा १५ हजार कोटींचा अतिरिक्त निधी बाहेरुन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘राज्यपाल यांनी ठरवून दिलेल्या सुत्रानुसारच निम्न तापी प्रकल्पाला हा वाटा मिळणार आहे. केंद्र सरकारचे धोरण हे कामे सुरु असलेले प्रकल्प पुर्ण करण्याचे आहे. गोसे खुर्द मध्ये राज्याचा वाटा कमी आहे. सरकार सध्या मोठ्या प्रकल्पांना गती देण्याचे काम करीत आहे. धुळे आणि नंदूरबारच्या २२ उपसासिंचन प्रकल्पांसाठी ११५ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. कुऱ्हा वडोदा प्रकल्पासाठी साडेपाच कोटी देण्याचा प्रस्ताव आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि बळीराजा योजना यातून देखील कामे सुरु आहेत.’
राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेबाबत पाटील यांनी सांगितले की,‘ खान्देश आणि विदर्भातील ८२ मतदार संघात ही परिसंवाद यात्रेच्या माध्यमातून भेट घेण्यात आली आहे. त्यानुसार आता पुढील काळात मराठवाडा आणि कोकण या भागाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात कार्यकर्त्यांंशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. अन्य पक्षातील काही जणांचे राष्ट्रवादीत प्रवेश झाले. त्यानंतर काही ठिकाणी जुने निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. मात्र ही अडचण आम्ही नक्कीच सोडविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.