लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पतीने जेवण केले की नाही याची विचारपूस करण्यासाठी आयसीयूमध्ये पाच ते सहा मिनिटांसाठी गेलेल्या अलका मधुकर लोणे (रा.शेंदुर्णी) यांच्या पर्समधून पंधरा हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना गुरुवारी अश्विनी हॉस्पिटल येथे घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवासी अलका लोणे या पती मधुकर लोणे व मुलगी युवती पाटील यांच्यासह वास्तव्यास आहेत. ५ मे रोजी पती मधुकर लोणे यांना उपचारार्थ जळगावातील शाहूनगरमधील अश्विनी हॉस्पिटल येथे दाखल केले. नंतर ११ मे रोजी अलका यांनादेखील मुलगी युवती हिने अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. तसेच मेडिकल बिलाकरिता साडेबारा हजार व जेवणाच्या डब्यासाठी अडीच हजार रुपये युवतीने आईला दिले होते. ते पैसे अलका यांनी पर्समध्ये ठेवले होते. दरम्यान, गुरुवारी (दि. १३) मे रोजी पती मधुकर यांनी जेवण केले की नाही, याची विचारपूस करण्यासाठी अलका या आयसीयू कक्षामध्ये गेल्या, तितक्यात त्यांच्या पर्समधील पंधरा हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेली. पाच ते सहा मिनिटानंतर त्या त्यांच्या जागेवर आल्या असता, त्यांना पर्समधील रोकड गायब झालेली दिसून आली. हा प्रकार त्यांनी लागलीच मुलगी युवती हिला सांगितला व डॉक्टरांनासुद्धा घटना कळविली. अखेर युवती पाटील यांनी गुरुवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.