लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : शहरातील न्यायालयात शनिवारी झालेल्या लोकअदालतीत दाखलपूर्व ३ हजार ९५८ खटले तसेच न्यायालयातील ९२४ खटले ठेवण्यात आल्यानंतर त्यातील १५३ खटले निकाली निघाले. त्यापोटी तीन कोटी ३२ लाख ६३ हजार ८३२ रुपयांची तडजोड रक्कम वसूल झाली.
अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात २५ रोजी लोकअदालतीचे आयोजन केले होते. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. पी. डोरले यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतीचे कामकाज झाले. लोकअदालतीत भारत संचार निगम, पालिका, टेलिफोन ऑफिस यांच्यासह अन्य विभागांतील दाखलपूर्व खटले ठेवण्यात आले होते. यावेळी दाखलपूर्व खटले तीन हजार ९५८ ठेवण्यात आले होते. त्यापैकी ३५ खटले निकाली निघाले तर न्यायालयातील ९२४ खटल्यांपैकी ११८ खटले निकाली निघाले. एकूण १५३ खटले निकाली निघाले. त्यापोटी तीन कोटी ३२ लाख ६३ हजार ८२५ रुपयांची तडजोड रक्कम वसूल करण्यात आली.
लोकन्यायालयात तीन पॅनल गठित करण्यात आली होती. पहिल्या पॅनलवर न्यायाधीश आर. आर. अहिर होते. त्यांच्यासोबत पंच म्हणून ॲड. अभिजीत मेने होते. दुसऱ्या पॅनलचे प्रमुख न्यायाधीश व्ही. जी. चौखंडे होते. त्यांच्यासोबत पंच म्हणून ॲड. इसरार शेख होते. तिसऱ्या पॅनलवर न्यायाधीश डी. एम. शिंदे होते व पंच म्हणून ॲड. स्वप्नील
...... यांनी काम पाहिले.
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डोरले यांनीही लोकअदालतीच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी न्यायालयीन कर्मचारी सतीश पाटील, राहुल पाटील, पी. बी. ठाकरे, किशोर पिंगाणे आदींनी सहकार्य केले.