लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुकानदार व अनेक भाजीपाला विक्रेते या उपाययोजनांना हरताळ फासण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा दुकानदारांवर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून सोमवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी शहरातील १६ दुकाने सील केली आहेत. तसेच प्रत्येक दुकानाला प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून ३० एप्रिल पर्यंत मुख्य बाजारपेठ परिसरासह शहरात काही निर्बंध लावले आहेत. मात्र शहरातील अनेक दुकानदार व व्यावसायिक लपून छपून व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने अशा दुकानदारांना याआधी समज देऊन कारवाई टाळली होती. मात्र सोमवारी अनेक दुकानदारांनी जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी न करता आपल्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी केलेली आढळून आली. यामुळे मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून शहरातील अनेक दुकानदारांवर कारवाई केलेली आहे.
या दुकानांवर करण्यात आलेली कारवाई
शहरातील संत कंवरराम मार्केट, संत गोधडीवाला मार्केटमधील दहा दुकाने सील करण्यात आली आहेत. यामध्ये अमित सिंथेटिक्स, प्रकाश ड्रेसेस, भवानी कलेक्शन, जय समाधा, कव्हर कृपा गारमेंट्स, कंचन ड्रेसेस, महावीर गारमेंट्स, ब्युटी गारमेंट्स, विकास ड्रेसेस, वैष्णवी गारमेंट्स, जय वैष्णवी तर भाटिया मार्केट परिसरातील श्रीराम होजिअरी , प्रेम प्लाईवुड , शिवबाबा शूज व मास्टर फुड्स ही दुकाने महापालिका प्रशासनाकडून सील करण्यात आली आहेत.
बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी
सोमवारी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील फुले मार्केट, सुभाष चौक परिसर, व शहरातील मुख्य बाजारपेठ भागात नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. प्रशासनाकडून नागरिकांना वेळोवेळी गर्दी न करण्याबाबत सूचना दिल्या जात असताना देखील नागरिक या सूचनांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहेत. मुख्य बाजारपेठ परिसरात अनेक भाजीपाला विक्रेते या ठिकाणी व्यवसाय थाटत असल्याचे चित्र सोमवारी पहावयास मिळाले. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून अनेक विक्रेत्यांवर कारवाई देखील करण्यात आली. मात्र या कारवाईला भीक न देता अनेक विक्रेत्यांनी दुकाने सुरू ठेवली.