लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात १० शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प (एअर सेपरेटर) सुरू करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात १६२५ ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती होणार आहे. त्यात सर्वात मोठा प्रकल्प हा मोहाडी येथील महिला रुग्णालयात तयार होणार आहे. तेथे तब्बल ५०० सिलिंडर एवढ्या ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे.
सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांत लाभदायक ठरत असलेल्या कृत्रिम ऑक्सिजनची मोठी टंचाई सगळीकडेच भासत आहे. त्यामुळे मेडिकल ग्रेडचा ऑक्सिजन रुग्णालयांमध्येच तयार व्हावा, यासाठी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मितीसाठी एअर सेपरेटर बसवले जाणार आहेत. त्यातून जिल्हाभरात दररोज १६२५ सिलिंडर एवढा कृत्रिम ऑक्सिजन तयार केला जाईल. या प्रकल्पांमध्ये हवेतूनच ऑक्सिजन वेगळा करण्याची प्रक्रिया केली जाते.
येथे होणार ऑक्सिजन निर्मिती
जिल्ह्यातील मोहाडी येथील महिला रुग्णालय, चोपडा, मुक्ताईनगर, चाळीसगाव, जामनेर, रावेर, भडगाव, अमळनेर, पारोळा आणि धरणगाव येथे हे प्रकल्प कार्यान्वित केले जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपूत यांनी दिली.
अंदाजपत्रकांना समिती देणार मंजुरी
सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकल्पांसाठीचे अंदाजपत्रक तयार केले आहे. हे अंदाजपत्रक आता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात येतील. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेतील समिती त्यावर निर्णय घेणार आहे.
कुठे किती सिलिंडर
मोहाडी महिला रुग्णालय ५०० सिलिंडर
चोपडा आणि मुक्ताईनगर रुग्णालय प्रत्येकी २५० सिलिंडर
चाळीसगाव व जामनेर प्रत्येकी १२५ सिलिंडर
रावेर, भडगाव, अमळनेर, पारोळा आणि धरणगाव प्रत्येकी ७५ सिलिंडर.