पंढरीनाथ गवळी/ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.27 - पावसाळ्यामुळे राज्यभरात वीजेची मागणी घटली आहे. त्यामुळे दीपनगर वीज निर्मिती केंद्रासह राज्यातील 32 पैकी 17 वीज निर्मिती संच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वीज निर्मिती ठप्प आहे. महाजनकोच्या वीज निर्मिती केंद्रात तयार होणा:या वीजेचे दर जास्त आहेत. त्यामुळे कमी किमतीतील वीज खरेदीवर शासनाचा अधिक भर आहे. विशेष करुन एनटीपीसी (नॅशनल थर्मल पॉवर स्टेशन) व खाजगी वीज केंद्रातून वीज खरेदी केली जात आहे.
दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील संच क्रमांक तीन दोन महिन्या पूर्वीच लोड मॅनेजमेंट सेल व्यवस्थापनाने बंद करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार हा संच बंद करण्यात आला. या आधीच संच क्रमांक दोनही बंद आहे. आता संच क्रमांक पाच व चार एमओडीमध्ये असल्याने यातील संच क्रमांक पाच बंद करण्याचे आदेश आहेत. तर संच क्रमांक चार हॅड्रोजन शुद्धतेसाठी बंद करण्यात आला आहे.1 हजार 420 मेगाव्ॉट क्षमतेच्या दीपनगर वीज केंद्रातील वीज निर्मिती ठप्प आहे.
मागणी घटली
दरम्यान, राज्यात पावसाळा सुरू झाला आहे.त्यामुळे ऐरवी 20-22 हजार मेगाव्ॉट वीजेची मागणी असलेल्या राज्याची आजची सोमवार मागणी 15 हजार 185 मेगाव्ॉट इतकी आहे. तर महानिर्मितीची वीज निर्मिती 7 हजार मेगाव्ॉट इतकी आहे.
एनटीपीसीची वीज स्वस्त
दरम्यान, दीपनगर येथील सूत्रांनी सांगितले की, एनटीपीसीकडून महाराष्ट्र वीज खरेदी करते.त्याचा दर 2.50 पैसे इतका आहे. सध्या ज्या प्रमाणे पेट्रोल पंपावर रोज पेट्रोलचे दर बदलत आहेत.त्याप्रमाणे राज्य व केंद्र वीज नियामक मंडळाकडून वीजेचे दर प्रत्येक महिन्याला बदलत असतात,असे सूत्रांनी सांगितले.
दीपनगर वीज केंद्रातील दर
सध्या दीपनगरातील वीज निर्मिती बंद असली तरी येथील 500 मेगाव्ॉटच्या दोन्ही संचाचे वीजेचे दर 2.89 पैसे इतके आहेत.
दर वाढीचे कारण
महाजनकोच्या वीज निर्मिती केंद्रातील वीज दर जास्त असल्याचे कारण सांगतांना सूत्रांनी सांगितले की, रेल्वेने कोळसा वाहून आणताना जास्त खर्च येतो. सध्या रेल्वेने कोळसा आणण्यासाठी 1700 रुपये टन या प्रमाणे खर्च येतो.याच्या उलट खाजगी वीज केंद्र हे कोळसा खाणींच्या शेजारी असल्याने त्यांची वीज आपल्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध होत आहे. सध्या काही खाजगी कंपनीचे दर दीड रुपये युनिट असे आहेत.
एमओडी (मेरीट ऑर्डर डिसपॅच)
दीपनगरातील 500 मेगाव्ॉट क्षमतेचे दोन्ही संच एमओडीमध्ये गणले जातात (मेरीट ऑर्डर डिसपॅच) महाराष्ट्रातील विद्युत निर्मिती खर्चाच्या क्रमाने वीज निर्मिती संच आहेत.त्यानुसार दर निश्चित केल जातात. सध्या दीपनगरातील दर दोन्ही संचांसाठी 2 रुपये 89 पैसे आहे. सध्या दीपनगरातील वीज निर्मिती थांबली असली तरी महाराष्ट्राची वीजेची मागणी वाढल्यानंतर येथील सर्व वीज निर्मिती संच पूर्ववत कार्यान्वित केले जातील,असे सूत्रांनी सांगितले. सध्या बंद असलेल्या संचाची दुरुस्ती व देखभालीचे काम करण्यात येत आहे.
राज्यातील बंद संच या प्रमाणे..
महाजनकोचे राज्यात सात वीज निर्मिती केंद्र आहेत.त्यात दीपनगर-भुसावळ, एकलहरे-नाशिक,पारस,परळी,खापरखेडा, कोराडी आणि चंद्रपूर. यातील बंद संच असे नाशिक-1, कोराडी-3,खापरखेडा-2, पारस-1,परळी-5,चंद्रपूर-1,भुसावळ-4 असे 17 संच बंद आहेत. एकूण वीज निर्मिती संच 32 आहेत. त्यापैकी तब्बल 17 बंद आहेत.