जळगाव : लॉकडाउनमुळे तामिळनाडू येथे दीड महिन्यांपासून अडकून असलेले विद्यार्थी मंगळवारी एस. टी. महामंडळाच्या बसेस्ने जळगावात परतले. कोरोनाची भीती आणि त्यात खाण्या-पिण्याचे हाल होत असल्यामुळे गावाकडे सुखरुप परतल्यानंतर विद्यार्थी भावूक झाले व स्वगृही परतल्याने त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंदही दिसून आला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च पासून लॉकडाउन करण्यात आल्याने तामिळनाडूत रेल्वे व विविध कंपन्यांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणारे विद्यार्थी तेथेच अडकून पडले होते. तसेच यामध्ये त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी संपल्याने रेल्वेकडून मिळणारे मानधनही बंद झाले होते.पैसे नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचे खाण्या-पिण्याचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते. यामध्ये जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा, नाशिक, चंद्रपूर व विविध जिल्ह्यातील तरुणांचा समावेश होता. सांगलीतून तामिळनाडूतील कामगारांना सोडण्यासाठी गेलेल्या बसेस्ने हे विद्यार्थी तेथून सोमवारी सायंकाळी सांगली जिल्ह्यातील मिरज येथे पोहचले आणि या ठिकाणाहून मंगळवारी सकाळी एस.टी बसेस्नेच जळगावात दाखल झाले.सात बसेस्मधून १७० विद्यार्थी जिल्ह्यात परतलेसांगली जिल्ह्यातून तामिळनाडूची सीमारेषा जवळ असल्याने प्रथम तामिळनाडूतून या विद्यार्थ्यांना सांगलीतील मिरज येथे आण्यात आले. या ठिकाणी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन रात्री १७० विद्यार्थ्यांना घेऊन या बसेस् जळगावकडे रवाना झाल्या. प्रत्येक बसेस्मध्ये २२ विद्यार्थ्यांना बसविण्यात आले होते. जळगावला सकाळी साडेअकरा वाजता बसेस् दाखल झाल्या.यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या हातावर सॅनिटाईजर टाकून त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांना जेवणाचे पाकीटही वाटप करण्यात आले.यावेळी विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, आगार व्यवस्थापक नीलेश पाटील, प्रज्ञेश बोरसे, वाहतूक अधिक्षिका नीलिमा बागुल, विभागीय वाहतूक अधिकारी नीलेश बंजारा, कामगार अधिकारी प्रशांत महाजन, ज्ञानेश्वर शिरसाठ यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक वर्ग उपस्थित होते. दरम्यान, गावाकडे सुखरुप परतल्याने या विद्यार्थ्यांच्या चेहºयावर एक वेगळाच आनंद दिसून आला.एक बस पहूरला झाली पंक्चरमिरजहून निघालेल्या सात बसेस्पैकी एक बस जळगावला येताना पहूरजवळ पंक्चर झाली. यामुळे तासभर ही बस या ठिकाणीच थांबून होती. त्यानंतर पंक्चर झालेले चाक बदलून ही बस जळगावला आली.मुलांना पाहताच पालकांच्या डोळ््यातून आनंदाश्रूलॉकडाउनमुळे तब्बल दोन महिन्यानंतर मुले गावाकडे परतत असल्याने मुलांना घेण्यासाठी अनेक मुलांच्या आई-वडिलांनी सकाळपासून स्थानकात गर्दी केली होती. बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच झाडाच्या सावलीत उभे राहून मुलांच्या बसेस्ची वाट पाहत होते. अखेर स्थानकात बसेस् आल्यानंतर बसेस्कडे धाव घेऊन मुलांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलांना पाहताच अनेक आई-वडिलांच्या डोळ््यातून आनंदाश्रू पडले. तर आई-वडिलांना भेटून मुलांचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. दरम्यान, जळगाव जिल्ह्यासह चंद्रपूर, नाशिक, मनमाड व इतर जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी दुपारी बसेस् रवाना झाल्या.मंगळवारीही परप्रांतीयांना सोडण्यासाठी बसेस् रवानागेल्या दोन दिवसांपासून जळगाव आगारातून परप्रांतीयांना सोडण्यासाठी बसेस् रवाना होत असून मंगळवारीदेखील मध्यप्रदेश व छत्तीसढ राज्यातील परप्रांतीयांना सोडण्यासाठी सीमारेषांच्या गावांवर बसेस् रवाना झाल्या. यामध्ये रावेर तालुक्यातील मध्यप्रदेशची सीमा असलेल्या चोरवड या गावी चार बसेस गेल्या. तर नागपूर जिल्ह्यातील छत्तीसढ राज्याची सीमा असलेल्या देवरी या गावी तीन बसेस् रवाना झाल्या.
तामिळनाडूत अडकलेले १७० विद्यार्थी स्वगृही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 12:31 PM