जळगाव : बीएचआर प्रकरणात ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले भागवत भंगाळे, प्रेम कोगटा यांच्यासह संशयितांनी एजंटमार्फत ६३१ पावत्यांच्या १७ कोटी ९५ लाख ९० हजार ३७४ रुपये रकमेचे आपल्या वैयक्तिक कर्जामध्ये समायोजन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या १२ संशयितांना अटक केल्यानंतर ज्या एजंटच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे त्यांचा शोध सुरू केला आहे.
पुणे येथील सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून २५ नोव्हेंबर २०२० रोजी अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह दहा जणांवर फसवणूक, अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे़ याप्रकरणी २६ नोव्हेंबर रोजी १३५ जणांचे पथक जळगावात दाखल होते. त्याच प्रकरणात पुन्हा पुणे पोलिसांची ५० जणांची १० पथके गुरुवारी जळगावात आली होती. तर पाच पथक औरंगाबाद तसेच मुंबई, अकोला व पुणे येथे पाठविण्यात आली होती. या पंधरा पथकांनी एकाच वेळी धाडसत्र राबवून सराफ तथा हॉटेल व्यावसायिक भागवत भंगाळे, दालमिल असोसिएशनचे प्रेम नारायण कोगटा, जयश्री मणियार, संजय तोतला (सर्व रा़ जळगाव), जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे, जितेंद्र रमेश पाटील, कापूस व्यापारी राजेंद्र लोढा (सर्व रा़ जामनेर), भुसावळ येथील माजी उपनगराध्यक्ष मुन्ना तेली यांचा मुलगा आसिफ तेली, प्रीतेश जैन (रा़ धुळे), अंबादास मानकापे (रा.औरंगाबाद), जयश्री तोतला (जळगाव) व प्रमोद कापसे (रा़ अकोला) या १२ जणांना अटक केली.
मध्यरात्री पथक पुण्याला रवाना
गुरूवारी सकाळी पुणे पोलिसांचे दहा पथक जळगावात दाखल झाले होते. दिवसभर अटक, पंचनामा व इतर प्रक्रिया पूर्ण करून ही पथके गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास संशयितांना घेऊन पुण्यासाठी रवाना झाले. दरम्यान, गुरुवारी प्रेम कोगटा, जयश्री तोतला व अंबादास मानकापे या संशयितांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना सुनावणीअंती २२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दुसरीकडे उर्वरित नऊ जणांना शुक्रवारी सकाळी ११.५५ वाजता पुणे न्यायालयातील न्या. नांदेडकर यांच्या न्यायालयात पोलिसांनी हजर केले. या नऊ जणांनादेखील न्यायालयाने २२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बीएचआरसंबंधी कागदपत्र जप्त
पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरिक्षक सुचिता खोकले यांचे पथकाने दिवसभर संशयितांची घरांची तपासणी केली़ यात बीएचआर संबंधित जी कागदपत्रे आढळून आली, ती ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती खोकले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
३० टक्के रक्कम देऊन खरेदी केल्या ठेव पावत्या
दरम्यान, संशयित आरोपींनी वेगवेगळ्या ठेवीदारांच्या ठेवी कमी किमतीत घेऊन कर्जाचे पूर्ण पैसे परतफेड करण्यासाठी वापर केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. इतकेच नव्हे तर असे करताना संशयितांनी स्वत: नेमलेल्या एजंटमार्फत ठेवीदारांमध्ये सदर पतसंस्था बुडाली असून मुदत ठेवीच्या ३० टक्के रक्कम मिळेल. परंतु, त्यासाठी मूळ पावत्या जमा करून तयार करून आलेल्या प्रतिज्ञा पत्रावर सह्या कराव्या लागतील. अन्यथा कुणालाच ठेवीचे पैसे मिळणार नाहीत. ठेवीदारांच्या ठेवी बुडाल्यात जमा आहेत. पतसंस्थेकडून पैसे मिळणे अशक्य आहे. अशी भीती निर्माण करून ३० टक्के रक्कम देऊन ठेव पावत्या खरेदी करून ठेवीदारांचे आर्थिक नुकसान केले असल्याचे समोर आले आहे.
ते एजंट कोण?
संशयितांनी एजंट अनिल पगारिया, संतोष बाफना, अशोक रुणवाल, अजय ललवाणी यांच्यासह अन्य एजंटची साखळी तयार केली होती. संशयितांनी ठेव पावत्या ठेवीदारांकडून गोळा करण्यासाठी नेमलेले एजंट कोण-कोण आहेत व त्याचा गुन्ह्यात काय सहभाग आहे, याचा तपास पुणे पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच तपासात सुनील झंवर व सुरज झंवर यांच्या कार्यालयातील संगणकामध्ये ठेवीदार व कर्जदार यांच्या याद्या पोलिसांना मिळून आल्या आहेत. या याद्यांशी त्यांचा काय संबंध आहे, या दिशेनेही पोलिसांना तपास सुरू आहे.
कर्ज प्रकरणांच्या तडजोडीसाठी घेतल्या बैठका
बीएचआरच्या मुख्य कार्यालयात विविध कर्ज प्रकरणांची तडजोड करण्यासाठी बैठक घेण्यात आल्याचेही पुणे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्याचबरोबर कर्ज निरंकच्या खोट्या नोंदी अवसायक जितेंद्र कंडारे, सुजीत वाणी यांनी केल्या असून त्यांचा गुरूवारी अटक केलेल्या संशयितांचा काय संबंध आहे, या दिशेनेही पुणे पोलीस तपास करीत आहेत.
विविध जिल्ह्यात जाणार पथक
तपासाच्या दृष्टीने अटकेतील आरोपींच्या बँक खात्यांची तसेच गुंतवणुकीची माहिती पोलीस गोळा करणार आहेत. बीएचआर व्यतिरिक्त संशयितांच्या कुठे-कुठे बैठक झाल्या, खोटे दस्तऐवज कुठे बनविण्यात आले आहे याचा तपास पोलीस करणार आहेत़ तसेच संशयित हे जळगाव, मुंबई, औरंगाबाद येथील रहिवासी असून त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ठेवीदारांच्या ठेवी वर्ग करून घेतल्या आहेत. याच्या तपासासाठी विविध जिल्ह्यांमध्ये पुणे पोलिसांचे पथक जाणार आहे.