कुसुंब्यातील दुहेरी हत्याकांड : तंत्रज्ञानाचाही आधार
जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दांपत्याचे हत्याकांड उघड होऊन तीन दिवस उलटले आहेत. या काळात पोलिसांनी संशयावरून १८ जणांची वेगवेगळी चौकशी केली. त्याशिवाय तंत्रज्ञानाचाही आधार घेण्यात आला आहे. मात्र, कुठलाच धागा गवसला नाही.
मुरलीधर व आशाबाई पाटील यांचा दोरी किंवा साडीने गळा आवळून खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आली. ही घटना बुधवारी रात्री ११ वाजेनंतर घडल्याचा अंदाज आहे. मुरलीधर व आशाबाई दोघांच्या गळ्यावर फास दिल्याचे व्रण आहेत. तर शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत. ओळखीच्या व्यक्तीकडूनच ही घटना घडली असावी व त्यातही मारेकरी दोनपेक्षा जास्त जण असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
शेवटचा काॅल रात्री पावणेअकरा वाजता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशाबाई यांनी बुधवारी पावणे अकरा वाजता कुसुंब्यातील एका महिलेला फोन करून व्याजाने दिलेल्या पैशांची मागणी केली होती. आशाबाई यांनी या महिलेला तीन वेळा फोन केल्याचे तपासात उघड झाले आहे, मात्र या घटनेशी त्या महिलेचा काही संबंध आहे का? याचीही पडताळणी पोलिसांकडून करण्यात आली, मात्र ठोस अशी माहिती मिळाली नाही.
आशाबाई यांचा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे त्यांचा अनेकांशी वाद होता. घरात सतत पाच ते दहा लाख रुपये असायचे, शिवाय २२ तोळ्यापेक्षा जास्त सोन्याचे दागिने घरात असायचे. दरोडा किंवा लुटीच्या उद्देशाने ही घटना घडली आहे का? या दिशेने तपास सुरू आहे. तसे असेल तर अहमदनगर जिल्ह्यातील पारधी टोळीवर संशय व्यक्त केला जात आहे.
या शक्यतांची केली पडताळणी
मुरलीधर पाटील यांचा बुधवारी दुपारी आणि रात्री रिक्षाचालकाशी दोन वेळा वाद झाला होता, त्याची तसेच पाटील ज्या ब्रोकरकडे कामाला होते, त्या ब्रोकरची दिवसभर चौकशी करण्यात आली. आई व मुलगी यांच्यात फारसे पटत नव्हते. तो धागाही तपासण्यात आला. आणखी काही शक्यता अशा आहेत त्या जाहीर करण्यासारख्या नाहीत, पण त्याचीही पडताळणी केली जात आहे. पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व निरीक्षक प्रताप शिकारे आदींनी पोलीस ठाण्यालाच नियंत्रण कक्ष बनविला असून हे अधिकारी ठाण मांडून बसलेले आहेत.