जळगाव : महापालिकेवर असलेल्या कर्जामुळे मनपा शिक्षण मंडळात कार्यरत असलेल्या १६० शिक्षकांचे १८ महिन्यांपासून, तर ५२५ सेवानिवृत्त शिक्षकांचे १९ महिन्यांपासून महापालिकेकडून देण्यात येणारे पन्नास टक्के वेतन थकले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान, नुकतेच मुंबई नगर विकास विभागाने मनपा आयुक्त यांना थकीत वेतन करण्याच्या सूचना केल्या असून त्याबाबतचा अहवाल आमदार सुरेश भोळे यांना देण्याचेही कळविले आहे.महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळातंर्गत १६० शिक्षक तर ५२५ सेवानिवृत्त कार्यरत आहेत. या शिक्षक व सेवानिवृत्तांच्या वेतनासाठी शासन पन्नास टक्के अनुदान देते तर पन्नास टक्के निधी हा महानगरपालिका शिक्षण मंडळाला देत असते. यातच नेहमीच शासनाकडून शिक्षक व सेवानिवृत्तांच्या वेतनासाठी अनुदान शिक्षण मंडळाला प्राप्त होते. मात्र, गेल्या १८ ते १९ महिन्यांपासून मनपाने पन्नास टक्के थकविले आहे़ अनेकवेळा मनपाकडून वेतन थकविले जात असल्यामुळे शिक्षकांकडून आंदोलन उपोषणे करण्यात आली़ खंडपीठात सुध्दा शिक्षकांनी धाव घेतली. मात्र, वेतन अदा करण्याच्या सुचना असताना सुध्दा मनपाकडून मोजकीच रक्कम शिक्षण मंडळाला अदा करण्यात येत असते. यंदा तर एप्रिल २०१६ पासून मार्च २०१९ या कालावधीत तब्बल १८ महिन्यांचा शिक्षकांचे तर फेब्रुवारी २०१६ ते मार्च २०१९ या कालावधीतील १९ महिन्याचे सेवानिवृत्तांचे वेतन थकीत आहे. सुमारे शिक्षकांच्या वेतनाची ६ कोटी ८५ लाख ६४ हजार ६६० रूपये तर सेवानिवृत्ती वेतन ८ कोटी ६८ लाख रूपये मनपाकडे थकीत आहे. एकूण मनपाला १५ कोटी ५३ लाख ६४ हजार ६६० रूपये शिक्षण मंडळाला अदा करावयाची आहे. १८ ते १९ महिन्यांपासून पन्नास टक्के वेतन मनपाने अदा न केल्यामुळे शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक हे आर्थिक अडचणीत सापडले आहे़त.
मनपा शिक्षकांचे १८ तर सेवानिवृत्तांचे १९ महिन्यांचे वेतन थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:33 PM
वेतन अदा करण्याच्या सूचना : मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
ठळक मुद्देशिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक आर्थिक अडचणीत१५ कोटी ५३ लाख ६४ हजार ६६० रूपये मनपाकडे थकीत