लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे १९ बाधितांचे मृत्यू हे उपचारापूर्वीच झाल्याची नोंद शासकीय पातळीवर करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही संख्या स्थिर आहे. मात्र, येत्या महिनाभरात रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी २४ तासांच्या आत होणारे मृत्यू वाढले आहे. यात दोन दिवसांपूर्वीच सहा तासांच्या आत चार मृत्यू नोंदविण्यात आले होते.
कोरोनामध्ये उपचारांसाठी पर्याय उपलब्ध असावेत यासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली होती. यात जिल्हाभरात ४५ रुग्णालयांना कोरोना उपचारांची परवागनी देण्यात आली आहे. मात्र, खासगी रुग्णालयांनी त्यांचा मृत्यूदर वाढू नये म्हणून मध्यंतरी गंभीर रुग्णांना दाखल करून घेतले जात नव्हते आताही व्हेंटिलेटरची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना दाखल केले जात नसून व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जाते. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या अचानक वाढली आहे. गेल्या तीन दिवसात ४२ बाधितांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. दरम्यान, आजपर्यंत १५६९ कोरोना बाधितांचे मृत्यू झालेले आहेत. यात १९ मृत्यू हे उपचारापूर्वीच झाल्याची नोंद आहे.
जीएमसीतील मृत्यू : ५८८
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मृत्यू : ४५८
खासगी रुग्णालयातील मृत्यू : ५२३
जीएमसीतील ५५० मृत्यूंचे परीक्षण
२४ तासाच्या आतील मृत्यू : १६.१८ टक्के
२४ ते ७२ तासाच्या आत : २८ टक्के
पुरूष : ३६८
महिला १८२
तातडीने तपासणी करा
दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण अचानक गंभीर अवस्थेत जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे थोडीही लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. दुसरीकडे अंगावर आजार काढल्याने तो जीवावर बेतू शकतो, असेही निदर्शनास आले आहे. शिवाय संसर्गाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गृहविलगीकरणात लक्ष हवे
गृहविलगीकरणात ६६८६ रुग्ण असून या रुग्णांवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अनेक वेळा औषधोपचार न घेता केवळ विलगीकरणात राहिल्यानेही रुग्ण गंभीर होऊ शकतात, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या लक्षणानुसारच निर्णय घ्यावेत असेही डॉक्टरांकडून सांगण्यात येते.