जळगाव : जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून आतापर्यंत सरासरीच्या ७.५ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत खरीपाच्या १९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून पेरण्यांना वेग आला आहे. दरम्यान काही ठिकाणी मात्र जिल्ह्यातील १५ पैकी ९ तालुक्यात अद्यापही ५० मिमी पेक्षा कमीच पाऊस झाला असून तेथे आणखी पावसाची प्रतीक्षा आहे. तर पाऊस येईलच या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या करून टाकल्या आहेत.जिल्ह्यात १ ते २८ जून या कालावधीत सरासरी ५० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात जामनेर तालुक्यात सर्वाधिक १११.८ मिमी, भुसावळ ६३.९ मिमी, यावल ७०.१ मिमी, बोदवड ९४.३ मिमी, पाचोरा ६५.५ मिमी, चाळीसगाव तालुक्यात ५४.४ मिमी पाऊस झाला आहे.उर्वरीत ९ तालुक्यांमध्ये अद्यापही ५० मिमीपेक्षा कमीच पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अद्यापही पेरणीसाठी पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.जळगाव, यावल, बोदवडला जोरदार हजेरीगुरूवारी दिवसभरात तसेच शुक्रवारी पहाटे जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली.यात एकाच दिवसात जळगावला ३१.९ मिमी, जामनेर २४.१ मिमी, भुसावळ १९.९ मिमी, यावल ४९.९ मिमी, रावेर २२.८ मिमी, मुक्ताईनगर २५.५ मिमी, बोदवड ३५ मिमी, तर चोपडा येथे १८.६ मिमी पावसाची नोंद झाली.कापसाची २४ टक्के पेरणी पूर्णकापसाचे क्षेत्र ५ लाख १० हजार ९११ हेक्टर असून त्यापैकी आतापर्यंत १ लाख २४ हजार ८८१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. म्हणजेच सुमारे २४ टक्के पेरणी झाली आहे. आठवडाभरात पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे.तूर, मूग, उडीदाची लागवड घटलीजिल्ह्यात तुरच्या १७ हजार ५२१ हेक्टर क्षेत्रापैकी २६८५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर मुगाची ३२ हजार ३३८ हेक्टरपैकी १ हजार ९८२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. उडीदाची ३५ हजार ७८० हेक्टरपैकी २०७५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात १९ टक्के पेरण्या पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:33 PM