रावेर : तौक्ते व यास चक्रीवादळाचे पडसाद पाहता तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्यालगतच्या भागात झालेल्या वादळी पावसाच्या नुकसानीनंतर तापी काठच्या १३ गाव शिवारातील केळी नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील शेत बांधावर फिरत असतानाच वादळी पावसाच्या धुमश्चक्रीने पुन्हा सातपुड्याच्या पर्वतराईत धुमाकूळ घातला. १८९ हेक्टरमधील केळी बागा भुईसपाट करून ७.५६ कोटी रूपये तर ८१ घरांवरील टीनपत्र्याचे छत उडून तर झाडं घरावर पडून पडझड झाल्याने १२ लाख ३५ हजार रूपये असे एकूण ७.६८ कोटी रूपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल व तालुका कृषी अधिकारी एम.जी.भामरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.
गत मंगळवारी व गुरुवारी तब्बल तास - दीड तास तुफान वादळी पावसाच्या तांडवाने रूद्रावतार धारण केल्याने तापी काठच्या खिर्डी, धामोडी, कांडवेल, ऐनपूर, विटवे परिसरातील १३ गाव शिवारातील ७५८ हेक्टर क्षेत्रातील ऐन कापणीवरील केळी बागा जमीनदोस्त होऊन ३० कोटी ३० लाख ४० हजार रूपये नुकसानीचा तर ५१२ घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता.
पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शनिवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत तापी काठच्या जमीनदोस्त झालेल्या ऐन कापणीवरील हिरव्यागार केळी बागांच्या नुकसानीची शाश्वत पाहणी करीत असतानाच वादळी पावसाने शनिवारी सातपुड्याच्या पर्वतराईतील पाल, गुलाबवाडी, जिन्सी, मोरव्हाल, अभोडा बुद्रूक, अभोडा खुर्द, कडून सुकीकाठच्या सावखेडा बुद्रूक, सावखेडा खुर्द, कुंभारखेडा मार्गे पुन्हा थेट तापी काठच्या आंदलवाडी, बलवाडी, सिंगत व पुरी शिवारातील केळी बागा जमीनदोस्त होऊन करोडो रुपयांची अपरिमित हानी झाली.
वृद्धा जखमी
याच वादळी पावसात पाल येथील सातपुडा शिक्षण संस्थेचे आदिवासी आश्रम शाळेवरील टीनपत्र्याचे छत उडून तसेच ५४ घरे, गुलाबवाडी येथील १२ घरे, मोरव्हाल येथील सहा व जिन्सी येथील नऊ घरे अशा ८१ घरांची पडझड झाली. यादरम्यान वादळी पावसात झाडाची फांदी तुटून डोक्यात पडल्याने सुगंताबाई देवसिंग पारधी (वय ६५) रा. पाल या वृद्धेचा चेहरा सुजून मेंदूस गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली.
तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी रविवारी सातपुड्याच्या पर्वतराईत आपद्ग्रस्त भागाची पाहणी केली.यावेळी महसूल भाग मंडळाधिकारी सचिन पाटील व तलाठी गुणवंत बारेला व कृषी सहायक उपस्थित होते.