मोकाट कुत्र्यांची गेल्या पाच वर्षांची संख्या
२०१६ -१५ हजार ८२०
२०१७ - १६ हजार २३३
२०१८ - १७ हजार ०२१
२०१९ - १८ हजार १२७
२०२० - १९ हजार १२०
- ११ महिन्यात २७५ जणांना चावा
- १ मुलाचा कुत्र्यांचा हल्ल्यात मृत्यू
- २०० कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया
- ३ महिन्यातच निर्बीजीकरणाचे काम थांबले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत जात असून, शनिवारी एकाच दिवसात शहरातील वाघ नगर भागात सात मुलांना कुत्र्यांने चावा घेतल्याची घटना घडली होती. दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची समस्या बिकट होत असतानाही मनपाकडून अद्यापही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरणाचे काम थांबल्याने ही संख्याही वाढतच जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही समस्या मोठी होण्याची शक्यता आहे.
मनपाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अमरावती येथील एका संस्थेला दीड कोटींची निविदाप्रक्रिया राबवून मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचा मक्ता देण्यात आला होता. मात्र, काही प्राणी प्रेमींनी या कामाबाबत आक्षेप घेतल्यानंतर केंद्र शासनाने मनपाला हे काम थांबविण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, आता चार महिन्यांपासून हे काम थांबले आहे. त्यामुळे शहरात कुत्र्यांची संख्या वाढत
जात असून, सध्यस्थितीत शहरात १९ हजार मोकाट कुत्रे आहेत. शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यालगत मोकाट कुत्र्यांचा हौदोस सर्वात जास्त आहे. मनपाने डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० पर्यंत अमरावतीच्या संस्थेला मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरण करण्याचा मक्ता दिला होता. या संस्थेने या तीन महिन्यात २०० हून अधिक कुत्र्यांवर निर्बीजीकरण करण्यात आले. यासाठी डॉगरुम देखील तयार करण्यात आला होता.
कोट....
प्राणी मित्रांच्या तक्रारीवरून केंद्राच्या अॅनिमल वेल्फेअर ऑफ इंडियाने मनपाचे काम थांबविले होते. मात्र, शहरातील मोकाट कुत्र्यांचा समस्येबाबत वेल्फेअर ऑफ इंडियाला सर्व माहिती अवगत केली आहे. तसेच शहरात पुन्हा मोकाट कुत्र्यांचा निर्बीजीकरणाचे काम सुरु व्हावे अशा मागणीचे पत्र पाठविले आहे.
-पवन पाटील, आरोग्य अधिकारी, मनपा
मोकाट कुत्र्यांचा समस्येबाबत मनपा आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. अॅनीमल वेल्फेअर ऑफ इंडियाने घेतलेले आक्षेपांची माहिती देखील घेतली. निर्बीजीकरणाचे काम नियमात सुरु व्हावे यासाठी संबधित संस्थेलाही आश्वस्त केले जाईल व मक्तेदारालाही याबाबतच्या सूचना दिल्या जातील.
-भारती सोनवणे, महापौर