ऑनलाईन लोकमत
जळगाव : तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसअखेर एकूण 197 अर्ज दाखल झाले. यामध्ये सदस्य पदासाठी 161 तर सरपंच पदासाठी 36 अर्ज दाखल झाले. दरम्यान, वराड बुद्रुक व सावखेडा खुर्द येथील सरपंचपदासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज दाखल झाल्याने त्या ठिकाणी सरपंच निवड बिनविरोध मानली जात आहे. मात्र छाननीमध्ये काय होते, याकडे लक्ष लागलेले आहे.
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबर पासून सुरू झाली होती. मात्र पितृपक्षाममुळे त्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील निवडणूक कक्षाकडे कोणी फिरकलेच नव्हते. 19 रोजी भोलाणे सरपंचपदासाठी 1 अर्ज दाखल झाला होता. 20 रोजी सदस्य पदासाठी सहा तर सरपंच पदासाठी चार असे एकूण 10 , 21 रोजी सदस्य पदासाठी 40 तर सरपंच पदासाठी 16 असे एकूण 56 अर्ज दाखल झाले होते. सात दिवसात केवळ 67 अर्ज दाखल झाले असताना शेवटच्या एका दिवसात 130 अर्ज दाखल झाले. यामध्ये सदस्य पदासाठी 115 तर सरपंचपदासाठी 15 अर्ज दाखल झाले.
25 सप्टेंबर रोजी अर्जाची छाननी होणार असून नामनिर्देशनपत्र माघारीची मुदत 27 सप्टेंबर आहे. त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी मतदान होऊन 9 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल व त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल.
वराड व सावखेडा सरपंच बिनविरोध ! तालुक्यातील वराड बु. व सावखेडा खु. येथील सरपंच पदासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आला. यामध्ये वराड बु. सरपंच पदासाठी उखा किसन मोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध मानले जात आहे.
छाननीकडे लक्ष 25 सप्टेंबर रोजी दाखल अर्जाची छाननी होणार असल्याने यामध्ये वराड व सावखेडे येथील सरपंच पदासाठी दाखल अर्जाचे काय होते याकडे आता लक्ष लागलेले आहे. यामध्ये हे दोघेही अर्ज वैध ठरले तर हे दोघेजण बिनविरोध सरपंच ठरू शकतात.
वराड बु. व सावखेडा खु. येथील सरपंचपदासाठी केवळ एक-एक अर्ज दाखल झाल्याने तेथील सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध मानली जात असली तरी छाननीमध्ये काय होते, यावर सर्व अवलंबून आहे. - अमोल निकम, तहसीलदार, जळगाव