जळगाव : उद्योग व बाजारात उधारीवर व्यवसाय चालतो, असे मानले जाते. मात्र पोलिसांच्या कारवायाही आता उधारीवर होऊ लागल्या आहेत. जानेवारी ते मे या पाच महिन्यात पोलिसांनी ८३ हजार ८३२ वाहनधारकांवर कारवाई करून २ कोटी ८४ लाख ८४ हजार १०० रुपयांचा दंड आकारला, मात्र त्यापैकी २१ हजार ४१३ वाहनधारकांनीच ५१ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा दंड भरला. ६२ हजार ४१९ वाहनधारकांनी तब्बल २ कोटी ३२ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा दंड थकविला आहे. ही उधारी जमा करण्यासाठी पोलिसांना पकडलेल्या वाहनाला चालूची कारवाई करण्यापेक्षा मागील दंडाची पडताळणी करावी लागत आहे.
अपघातांचे प्रमाण टाळण्यासाठी वाहनधारकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. वाहनधारक नियम पाळतात की नाही, याची पडताळणी व कारवाई करण्याची प्रमुख जबाबदारी पोलिसांची आहे. पोलीस स्टेशन व शहर वाहतूक शाखा यांच्याकडून वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली जाते. विनापरवाना वाहन चालविणे, सीटबेल्टचा वापर न करणे, नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, मोबाईलवर बोलताना वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द मोटार वाहन कायद्यानुसार या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील विविध चौक, मुख्य मार्ग, महामार्ग आदी ठिकाणी कारवाईसाठी फिक्स पॉईंट लावण्यात येतात. आकाशवाणी चौक, इच्छा देवी चौक, अजिंठा चौक, कोर्ट चौक व टॉवर चौक या भागात सर्वाधिक कारवाई झालेली आहे.
विना हेल्मेट सर्वाधिक दंड वसूल
या पाच महिन्यांत विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांकडून सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला आहे. १५ हजार १८९ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ७५ लाख ९४ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. त्याखालोखाल ट्रीपल सीट व विना लायसन्स वाहन चालविणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.
महामार्गावर सर्वाधिक कारवाया
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगाव व भुसावळ येथे सर्वात जास्त कारवाया करण्यात आलेल्या आहेत. त्याशिवाय चाळीसगाव येथेही कारवाया केलेल्या आहेत. महामार्गावर दुचाकी चालवायची असेल तर हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. महामार्गावर वाहतूक जास्त असल्याने अपघाताचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे महामार्गावरच मोठ्या संख्येने वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली जाते.
जानेवारी ते मे अशी आहे कारवाई...
एकूण कारवाया : ८३,८३२
एकूण दंड : २,८४,८४,१००
दंड भरलेले वाहनधारक : २१,४१३
दंड न भरलेले वाहनधारक : ६२,४१९
एकूण वसूल दंड : ५१,८८,६००
एकूण थकीत दंड : २,३२,९५,५००