किरण चौधरी
रावेर जि. जळगाव : तालुक्यात १८ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळामुळे दोन कोटी ३६ लाखांचे नुकसान झाले आहे. यात ४४ गावातील जवळपास ५०० शेतकऱ्यांच्या ३२५ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे, असा अंतिम अहवाल तालुका प्रशासनातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे.
रावेर तालुक्यातील रावेरसह चोरवड, खानापूर, कर्जोद, वाघोड, केर्हाळे, विटवे, निंबोल, ऐनपूर, खिर्डी, निंभोरा रेंभोटा व वाघाडी शिवारासह ४४ गावांचा यात समावेश आहे. यात रब्बी हंगामातील हरभरा,मका व गव्हाचे उभे पीक तसेच केळीबागा अवकाळी व वादळी पावसाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाल्या होत्या.
पंचनाम्यातील अहवालानुसार,तालुक्यातील १५४ शेतकऱ्यांच्या ११९ हेक्टर क्षेत्रातील हरभरा पीक वादळी पावसाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाले. यात ७० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच, ८४ शेतकऱ्यांच्या ५४ हेक्टर क्षेत्रातील गहू जमीनदोस्त झाला. यात ९६ लाख ४८ हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच २४८ शेतकऱ्यांचा १४३ हेक्टर क्षेत्रातील मका जमीनदोस्त होऊन ३२ लाख ३२ हजारांचे तर १४ शेतकऱ्यांच्या ७ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा जमीनदोस्त होऊन ३६ लाख ४० हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
नुकसानीचा अंतिम अहवाल बुधवारी तहसीलदार उषाराणी देवगुणे, रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल व प्रभारी तालुका कृषी अधिकारी एम. जी. भामरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे.