जळगाव : जिल्ह्यात काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा परतली असून, दोन दिवसातच किमान तापमानात तब्बल पाच अंशाची घट झाली आहे. तसेच कमाल तापमानात देखील चार अंशाची घट झाल्यामुळे शुक्रवारी कमाल तापमान २५ अंशापर्यंत खाली आले होते. त्यामुळे दिवसा देखील प्रचंड गारवा जाणवत होता. थंडीमुळे नागरिकांना दिवसा देखील अंगात गरम कपडे परिधान केले होते.यंदा थंडीचा जोर कमी-जास्त प्रमाणात अनुभवयास मिळत आहे. सातत्याने अरबी समुद्र व बंगालचा उपसागराकडून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांचा मार्ग अडविला जात आहे.त्यामुळे यंदा थंडीचे प्रमाण काही दिवस वाढ व घट झालेली पहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे कमाल व किमान तापमानात वाढ झाल्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले होते.मात्र, गुरुवारी रात्रीपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला असून, पुन्हा कडाक्याची थंडी परतली आहे.बुधवारी १८ अंश असलेला पारा शुक्रवारी १३ अंशापर्यंत घसरला होता. तसेच कमाल तापमानाचा पारा देखील २९ अंशावरून थेट २५ अंशापर्यंत घसरला होता.आगामी दोन दिवस जिल्ह्यात कोरडे हवामान पहायला मिळणार आहे. त्यामुळे अजून दोन दिवस तापमानात घट होवून थंडीची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.१५ किमी प्रती तास वाहताहेत वारेतापमानात एकीकडे घट झाली असताना दुसरीकडे जिल्ह्यात १५ किमी प्रतीतास वेगाने वारे वाहत असल्याने थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. तापमानातील घटमुळे रब्बी पिकांना फायदा होत आहे. दव तयार होत असल्याने कोरडवाहू हरभरा, मका व दादरला देखील फायदा होणार आहे. दरम्यान, तापमानात घट झाल्यासोबतच वातावरणात मोठ्या प्रमाणात धुक देखील पडलेले पहायला मिळाले. पुढील आठवड्यात पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून, त्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होवून तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दोन दिवसात किमान तापमानात ५ अंशाची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:27 PM